अहमदनगर – ‘अर्बन’चे दोन माजी संचालक चौकशीसाठी ताब्यात

नगर – नगर अर्बन बँक गैरव्यवहार प्रकरणी पोलिसांनी दोन माजी संचालकांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. बँक गैरव्यवहार प्रकरणातील पोलिसांनी संशयीतांच्या मुसक्या आवळण्यास सुरुवात केली आहे. भाजपचे माजी नगरसेवक साठे आणि कोठारी नामक अशा दोन माजी संचालकांना पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले असल्याची माहिती सूत्रांकडून समजत आहे.
मागील आठवड्यात न्यायालयाने पोलिसांच्या कामकाजावर ताशेरे ओढले होते. अर्बन बँक गैरव्यवहाराच्या तपासकामी अपर पोलिस अधीक्षक प्रशांत खैरे यांच्या अध्यक्षतेखाली एसआयटी (स्पेशल इन्व्हेस्टिगेशन टीम) गठीत करण्यात आली आहे. या प्रकरणाचा तपास योग्य दिशेने व्हावा, यासाठी पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी एसआयटी नेमली आहे.
त्यानंतर पोलीस आता ॲक्शन मोडवर आली आहे. या प्रकरणात अनेक दिग्गज आरोपी असल्याने पोलिसांच्या कामावर परिणाम होताना दिसत होता. मात्र ही बाब बँक बचाव समितीचे अध्यक्ष राजेंद्र गांधी आणि ठेवीदारांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर पोलिसांच्या कामकाजावर तीव्र नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर लगेच आता पोलिसांनी दोन माजी संचालकांना ताब्यात घेतल्यामुळे पोलीस ॲक्शन मोडवर आले दिसून येत आहे.





