संगमनेर बसस्थानक परिसरातील घटना ; गुन्हा दाखल संगमनेर – विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर दोन दिवसांत अज्ञात सात ते आठ तरुणांकडून तिघांना बेदम मारहाण करण्यात आली. ही घटना संगमनेर बसस्थानक परिसरात घडली. मारहाणीवेळी तुमची सत्ता आली म्हणून माजले का म्हणत जातीवाचक शिवीगाळ करण्यात आली असल्याच्या कारणाने संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. विशाल अशोक पराड (वय २४, रा. मालदाड रोड, संगमनेर) गुरुवारी (दि. २८ ) रात्री अकोले येथे अंत्यविधीसाठी गेले असता रात्री १० वाजता संगमनेर बसस्थानक येथे आले होते. रात्री उशिरा उतरल्यामुळे मनीष अरुण पडघलमल आणि प्रतिक नागराज आमेलिक या दोन मित्रांना घेण्यासाठी बोलावले होते. या दोन मित्रांना बसस्थानकात जाताना पहिल्याने विशाल याने त्या दोघांना ओरडून आवाज दिला. त्यावेळी येवले चहासमोर सात ते आठ अनोळखी मुले थांबलेले होते. त्यातील एकाने जोराने का ओरडतो म्हणून लाथाबुक्क्याने मारहाण केली. त्यावेळी मित्र प्रतिक आणि मनीष सोडवण्यासाठी आले असता तिघांनाही जमलेल्या सात ते आठ जणांनी जबर मारहाण करत तुमची सत्ता आली म्हणून माजले का म्हणत जातीवाचक शिवीगाळ केली. तसेच जीवे मारण्याची धमकी देत एकाने खिशातील चाकू काढून “तुमचा मुडदा पाडून टाकील” अशी धमकी दिल्याने तेथून कसेबसे जीव वाचवण्यासठी पळून जावे लागले. त्यानंतर शहर पोलीस ठाण्यात जाऊन त्या सात ते आठ अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.