अहमदनगर । अकोले आंदोलन उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावली

अकोले – तालुक्यातील गणोरे बाजारतळ येथे दूध दरासंदर्भात तरुण शेतकरी संदीप दराडे व शुभम आंबरे यांच्या उपोषणाचा आज सहावा दिवस असून, या उपोषणाला बळ देण्यासाठी दोन्ही तालुक्यातील दूध उत्पादक एकवटल्याचे दिसत आहे. शनिवारी सकाळपासूनच अकोले व संगमनेर तालुक्यातील जवळपास ११ गावे बंद असून, शासनाच्या धोरणांचा निषेध म्हणून गणोरे गावासह आढळा खोऱ्यात दुकाने बंद ठेवून सर्व व्यवहार ठप्प झाले आहे.
गणोरे, हिवरगाव आंब्रे, डोंगरगाव, पिंपळगाव निपाणी, समशेरपूर, वडगाव लांडगा, गुंजाळवाडी, सावरगाव पाट, वीरगाव, कळस, मेंगाळवाडी आदी संगमनेर व अकोले तालुक्यातील 11 गावांनी दूध उत्पादकांच्या आमरण उपोषणाला पाठिंबा म्हणून आज दुकाने बंद ठेवत कडकडीत बंद पाळण्यात आला. शासनाने तातडीने दूध उत्पादकांच्या मागणीचे दखल घेऊन योग्य तो निर्णय घ्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
शुक्रवारी दुपारी वंचित आघाडीच्या उत्कर्षा रुपवते यांनी भेट देऊन पाठिंबा दिला. रात्री खासदार भाऊसाहेब वाकचौरे, आमदार डाॅ.किरण लहामटे, गटनेते जालिंदर वाकचौरे उपोषण स्थळी दाखल होऊन आपल्या भावना व्यक्त करून उपोषणकर्त्यांचे मनोबल वाढवले. आज सर्वत्र कडकडीत बंद पाळण्यात येत आहे. शासनाने दूध दर वाढीसंदर्भात योग्य निर्णय न घेतल्यास तीव्र आंदोलनासाठी गुपित धोरण ठरविले आहे. या आंदोलनाचा केव्हाही उद्रेक होऊ शकतो. राज्याचे माजी मंत्री मधुकरराव पिचड यांनी गुणोरे येथे बाजारतळावर उपोषणाला भेट देऊन आंदोलनकांच्या तब्येतची विचारपूस केली.
दूध दरवाढ हा प्रश्न राज्याच्या अख्यतारित आहे. २२ तारखेला अधिवेशनात विरोधी खासदारांची मोट बांधून चर्चा घडवून आणण्याचा प्रयत्न करणार आहे. शासन अनुदानासह ३५ रुपये द्यायला तयार आहे. पाच रुपयांचा प्रश्न आहे. ४० रुपये शासनाने देण्यास हरकत नाही. ती देण्यास भाग पाडू. शासन वेळकाढूपणा करत आहे. शासनाने नाकर्तेपणा दाखवू नये. नको तो व्यर्थ खर्च टाळून शेतकऱ्याला उर्जितवस्था आणण्यासाठी सहकार्य करावे.
– भाऊसाहेब वाकचौरे, खासदार
तालुक्यातील प्रश्नासाठी अनेक नेत्यांना मी नडलो आहे.आपली जनता चांगल्या प्रश्नांसाठी आंदोलन करत असेल तर मी खूश आहे. शेतकरी महत्वाचा घटक समजून शासनाला निर्णय घ्यावा लागेल. विधानभवनात शेतकऱ्यांच्या दूध दराबाबत प्रश्न लावून धरणार आहे.
डाॅ.किरण लहामटे, आमदार





