स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई, 8 लाख 11 हजारांचा मुद्देमाल हस्तगत श्रीरामपूर – मजुरांचे पैसे देण्यास चाललेल्या मुकादमास सहा ते सात जणांनी सिनेस्टाईल पद्धतीने श्रीरामपूर तालुका हद्दीवरील राहाता तालुक्यातील नांदूर शिवारात लुटले होते. याबाबत स्थानिक गुन्हे शाखेने अल्पवधीतच धडक कारवाई करून चार आरोपींना राहाता तालुक्यातील वाकडी येथे जेरबंद केले आहे. दारासिंह तुकाराम डावर हे दि. 28 रोजी दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास मजुरांना मजुरीचे पैस वाटपासाठी घेऊन जात असताना नांदुर याठिकाणी अज्ञात आरोपींनी स्विफ्ट कारने फिर्यादीचे मोटार सायकलला धडक दिली. कोयत्याचा धाक दाखवून त्यांचेकडील 5,18,000 रूपये रोख रक्कम चोरून नेली. याबाबत श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. स्थानिक गुन्हे शाखेने मिळालेल्या माहितीनुसार वाकडी येथे सापळा रचून स्विफ्ट कार थांबवून 5 इसमांना ताब्यात घेतले. यातील एकजण पळून गेला. इम्रान आयुब शहा (वय 28, रा.आशीर्वादनगर, वॉर्ड नं.1, श्रीरामपूर), आनंद अमर पवार (वय 21, रा.दत्तनगर, श्रीरामपूर) ,शादाब अब्बास शेख, (वय 21, रा.दत्तनगर, श्रीरामपूर),रितेश बाबासाहेब आढाव (वय 19, रा.दत्तनगर, श्रीरामपूर) असे असल्याचे सांगितले. आरोपीकडे पळून गेलेल्या साथीदाराबाबत माहिती विचारली असता त्याचे नाव अमीत पठारे (रा.बेथेल चर्चजवळ, सुतगिरणी, श्रीरामपूर) असे सांगितले. तपास पथकाने आरोपींकडून 3 लाख रूपये रोख रक्कम, 60 हजार किंमतीचे 4 मोबाईल, साडेचार लाख रुपयाची स्विफ्ट, एक लोखंडी कत्ती असा एकूण 8 लाख ११ हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. आरोपी आनंद अमर पवार याने इम्रान आयुब शहा याचे सांगणेवरून शादाब अब्बास शेख, रितेश बाबासाहेब आढाव व अमीत पठारे अशांनी मिळून फिर्यादीच्या मोटार सायकलला धडक देऊन, लोखंडी कत्तीचा धाक दाखवून पैशाची बॅग जबरीने चोरून घेतल्याचे चौकशीत सांगितले. जप्त करण्यात आलेली रक्कम ही चोरीमधील प्रत्येकच्या वाटणीस आलेली आहे. इम्रान शहा यास पोलिसांनी विश्वासात घेऊन विचारपुस केली असता सूरज सोपान मुठे (वय 24, रा.मुठेवडगाव, ता.श्रीरामपूर) व ऋषीकेश उर्फ सोन्या किशोर पागीरे (वय 25, रा.कांदा मार्केटजवळ, श्रीरामपूर) हे दोघे कांदा मार्केटमध्ये काम करतात. त्यांना फिर्यादी हा दर महिन्याला मार्केटयार्ड, श्रीरामपूर येथील व्यापाऱ्याकडून 5 ते 6 लाख रूपये मजुरांना पेमेंट करण्यासाठी मोटार सायकलवरून बॅगमध्ये घेऊन जात असल्याची माहिती होती. इम्रान शहा व सुरज मुठे यांना पैशाची गरज असल्याने त्यांनी ऋषीकेश पागीरे याचे मदतीने फिर्यादीस लुटण्याचा कट केला. दि.28 रोजी फिर्यादी हा मार्केट यार्ड, श्रीरामपूर येथून पैस घेऊन निघाल्याची माहिती ऋषीकेश पागीरे याने इम्रान शेख व सूरज मुठे यांना दिली. मुठे याने फिर्यादी पल्सर मोटार सायकलवरून जात असताना त्याचा पाठलाग करून इम्रान शेख यास दारासिंग डावर दाखवून दिला. त्यानंतर इम्रान शेख व त्याचे इतर साथीदारांनी फिर्यादीचा अस्तगाव रोडपर्यत पाठलाग करून फिर्यादीस लुटल्याची माहिती चौकशी दरम्यान दिली. चोरी केलेली काही रक्कम खर्च झाल्याचेही त्यांनी सांगितले.सर्व 6 आरोपीना गुन्ह्याचे तपासकामी श्रीरामपूर शहर पोलीस ठाणे येथे मुद्देमालासह हजर करण्यात आले.