अहमदनगर । शेवगाव – वरुर रस्त्याचे रूपडे पालटले

शेवगाव – साधारणत : लोकांच्या रस्त्याच्या दुरावस्थेबद्दल तसेच झालेल्या कामाबद्दल कायम तक्रारी असतात. मात्र, एखाद्या रस्त्याचे काम ठेकेदाराने चांगले केले तर लोक त्या कामाबद्दल कौतूक देखील करायला विसरत नाहीत, असा अनुभव नुकताच आला आहे.
शेवगावच्या गुरुदत्त सामाजिक संस्थेचे सचिव तथा गव्हर्मेंट कॉन्ट्रॅक्टर फुलचंद रोकडे यांनी शेवगाव – वरुर या ५ किमी अंतराच्या रस्त्याचे डांबरीकरणाचे काम दर्जेदार केल्याने त्यांचा श्रीक्षेत्र वरुर येथील वारकरी सेवा संघातर्फे मुकुंद महाराज अंचवले यांच्याहस्ते श्रीविठ्ठल -रुक्मिणी प्रतिमा, शाल,श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला.
‘ धाकटी पंढरी ‘ श्रीक्षेत्र वरुर येथे श्री विठ्ठलाचे साडेचारशे वर्षाचे पुरातन मंदिर असून तेथील वालुकामय मूर्ती स्वयंभू आहेत. या रस्त्याच्या डांबरीकरण कामासाठी आ.मोनिका राजळे यांनी निधी उपलब्ध करून दिला. सार्वजनिक बांधकाम खात्याचे कार्यकारी अभियंता के.बी.दंडगव्हाळ, शेवगावचे उपविभागीय अभियंता प्रल्हाद पाठक, शाखा अभियंता रामेश्वर राठोड तसेच निवृत्त कर्मचारी सुरेश घुले यांच्या मार्गदर्शनाखाली रोकडे यांनी या रस्त्याचे काम मुदतीत व दर्जेदार केल्याने त्यांचा वारकरी सेवा संघाच्यावतीने सत्कार करण्यात आला.





