दुहेरी हत्याकांडाने अहमदनगर हादरलं ! आरोपीने केली आपल्या दोन्ही वहिनींची हत्या

अहमदनगर : अहमदनगर जिल्हा दुहेरी हत्याकांडाने हादरला आहे. अहमदनगरच्या अकोले तालुक्यातील बेलापूर गावामध्ये हे दुहेरी हत्याकांड घडले आहे. यामध्ये आरोपीने आपल्या दोन्ही वहिनींची हत्या केली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. ही हत्या केल्यानंतर आरोपी दीर घटनास्थळावरून फरार झाला आहे. दत्तात्रय प्रकाश फापाळे असे आरोपी दिराचे नाव आहे.
काय घडले नेमके?
अकोले तालुक्यातील पठार भागातील बेलापूर गावात ही घटना घडली आहे. जमिनीच्या आणि पैशाच्या किरकोळ वादातून दिराने दोन भावजयांची निर्घृणपणे हत्या केली आहे. भरवस्तीत दिवसाढवळ्या ही हत्या करण्यात आली. धारदार कोयत्याच्या सहाय्याने दिराने दोन्ही वहिनींवर वार केले. यामुळे त्या गंभीर जखमी झाल्या आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला.
उज्ज्वला अशोक फापाळे आणि वैशाली संदीप फापाळे अशी दोन्ही मृत महिलांची नावे आहे. आरोपीची आई फुलाबाई प्रकाश फापाळे यांच्या डोळ्यांसमोरच ही घटना घडली असून त्यांनी पोलिसांना याची माहिती दिली. पोलिस आरोपीचा शोध घेत असून अकोले पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.





