अहमदनगर : लेझर शोमुळे शिर्डीच्या लौकिकात भर

शिर्डी – शिर्डीत आलेल्या साईभक्तांनी शिर्डीत थांबावे, त्यांना साई दर्शनानंतर मनोरंजनाचा उत्तम पर्याय उपलब्ध व्हावा यासाठी साईतीर्थ थीम पार्कच्या साईभक्तांसाठी रोज नि:शुल्क दाखवला जाणारा लेझर शोचा कार्यक्रम शिर्डीच्या लौकिकात भर घालणारा ठरेल असे प्रतिपादन खासदार सदाशिव लोखंडे यांनी केले.
शिर्डी येथे मालपाणी उद्योग समूहाद्वारा साई भक्तांच्या मनोरंजनासाठी तयार केलेल्या लेझर शोचे उद्घाटन खा. लोखंडे यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शालिनीताई विखे पाटील, मालपाणी उद्योग समूहाचे चेअरमन राजेश मालपाणी आणि मालपाणी परिवार सदस्य उपस्थित होते.
शालिनीताई विखे म्हणाल्या, मालपाणी परिवार नेहमीच प्रत्येक क्षेत्रात वेगळेपण जपत असतो. शिर्डीत साईभक्तांसाठी रोज नि:शुल्क दाखवल्या जाणाऱ्या लेझर शोच्या माध्यमातून त्यांनी साईभक्तांबद्दलची बांधिलकी जपली आहे. मालपाणी उद्योग समूहाचे संचालक डॉ. संजय मालपाणी म्हणाले, साईतीर्थ थीम पार्कमध्ये साईभक्तांना अत्याधुनिक तंत्रज्ञानाची जोड देऊन तयार केलेले कार्यक्रम एक अनोखी आध्यात्मिक अनुभूती देऊन जातात. तशीच अनुभूती या नव्या लेझर शोच्या माध्यमातून मिळणार आहे. मनिष मालपाणी यांनी साईतीर्थ पार्कमध्ये भविष्यात अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून निर्माण करण्यात येणाऱ्या कार्यक्रमांची माहिती दिली.
मालपाणी उद्योग समूहाच्या थीम पार्क आणि वॉटर पार्क विभागाचे कामकाज बघणारे संचालक जय मालपाणी यांनी आपल्या प्रास्तविकातून लेझर शो निर्मिती मागची भूमिका विषद केली. यावेळी शिवसेनेचे उत्तर जिल्हाप्रमुख कमलाकर कोते, निमगाव कोऱ्हाळे सरपंच कैलास कातोरे, प्रमोद गोंदकर, किशोर बोरावके आणि गफ्फार पठाण, उद्योग समूहाचे संचालक गिरीश मालपाणी, आशिष मालपाणी, श्रेया मालपाणी उपस्थित होते. सूत्रसंचालन डॉ. संतोष खेडलेकर यांनी केले.
====================





