अहमदनगर : अगस्ती कारखान्याचे कोविड सेंटर चांगली सेवा देईल : पिचड

अकोले (प्रतिनिधी) –अगस्ती सहकारी साखर कारखान्याने पुढाकार घेऊन सुरू केलेले कोविड सेंटर संभाव्य बाधित करोना रुग्णांना चांगली सुविधा देईल, असा विश्वास माजी मंत्री व अगस्ती सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष मधुकरराव पिचड यांनी व्यक्त केला.
अकोले शहरापासून एक किलोमीटर अंतरावर रेडे शिवारात 100 खाटांचे सेंटर आज विठ्ठल लॉन्स येथे सुरू करण्यात आले. अगस्ती कारखान्याने पुढाकार घेऊन सुरू केलेल्या या सेंटरचा लोकार्पण सोहळाआज दुपारी पार पडला, यावेळी पिचड बोलत होते.
माजी आमदार वैभवराव पिचड, जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष सीताराम गायकर, तहसीलदार मुकेश कांबळे, आरोग्य अधिकारी डॉ. इंद्रजीत गंभीरे, गिरजाजी जाधव, यशवंतराव आभाळे, अगस्ती सहकारी साखर कारखान्याचे सर्व संचालक , कारखान्याचे कार्यकारी संचालक भास्करराव घुले, कारखान्याचे मुख्य लेखापाल एकनाथ शेळके, मुख्य अभियंता नितीन बंगाळ, सुधाकरराव देशमुख, भाजपचे तालुकाध्यक्ष सीताराम भांगरे आदी मान्यवर व्यासपीठावर होते.
पिचड म्हणाले, हे सेंटर सुरू करण्याचा आपल्याला व संचालक मंडळाला अजिबात आनंद नाही. पण नियतीने निमंत्रित केलेले करोनाचे संकट हे आपल्यापुढे वाढून ठेवल्याने हे सेंटर सुरू करण्याला अगस्ती कारखान्याने सामाजिक बांधिलकी म्हणून प्राधान्य दिले आहे. तहसीलदार मुकेश कांबळे यांच्या मार्गदर्शनानुसार व देखरेखीखाली हे केंद्र आपली आरोग्य सुविधा देण्याची भूमिका चोख बजावील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.नजिकच्या काळामध्ये कारखाना गळीत हंगाम सुरू होणार आहे. ऊस तोडणी कामगारांसाठीसुद्धा या सेंटरचे सहकार्य असेल.
माजी आमदार वैभव पिचड म्हणाले, बाधित रुग्णाला वेळ पडल्यास अन्य ठिकाणी हलवण्यापूर्वी प्राथमिक उपचार करू शकणारे हे सेंटर असेल. या सेंटरमध्ये नाममात्र फी शासन घेईल असे स्पष्ट करून प्रत्येकाने प्रत्येकाची काळजी घ्यावी तहसीलदार मुकेश कांबळे यांनी अगस्ती सहकारी साखर कारखान्याने देऊ केलेल्या मदतीचाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. प्रास्ताविक कारखान्याचे संचालक महेश नवले यांनी केले. तर संचालक अशोकराव देशमुख यांनी आभार मानले.





