अहमदनगर – इंदोरीकर सुनावणीला आजही गैरहजर

संगमनेर – प्रसिध्द कीर्तनकार निवृत्ती महाराज देशमुख यांच्या प्रकरणात गुरुवारी ( दि 8) सुनावणी होती. त्यांना बुधवारी ( दि 7) समन्स बजावण्यात आला. परंतु ते हजर राहिले नसून 21 नोव्हेंबर ही पुढील तारीख देण्यात आली आहे. इंदोरीकर यांच्या वकिलाकडून जामीन अर्ज दाखल करण्यात आला आहे.
पुत्रप्राप्तीबाबत वादग्रस्त विधान केल्या प्रकरणी हभप निवृत्ती महाराज देशमुख इंदुरीकर यांच्या विरोधात महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समितीने गर्भलिंग निदानाची जाहिरात केल्याचा आरोप करीत गर्भधारणापूर्व व प्रसुतीपूर्व निदान तंत्र, गर्भलिंग निदान प्रतिबंध कायदा (पीसीपीएनडीटी) कायद्यानुसार संगमनेरच्या न्यायालयात तक्रार केली होती. महाराजांनी जिल्हा व सत्र न्यायालयात आव्हान दिले होते. जिल्हा व सत्र न्यायालयाने संगमनेर कनिष्ठ न्यायालयाचा निर्णय रद्द ठरवत त्यांना दिलासा दिला होता.
यावर अंधश्रद्धा निर्मूलन समिती आणि राज्य सरकारच्यावतीने औरंगाबाद उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. तेथे कनिष्ठ न्यायालयाचा निकाल कायम ठेवण्यात आला. त्यावर इंदुरीकर यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. सुप्रीम कोर्टाने सुनावणी करताना औरंगाबाद उच्च न्यायालयाचा निकाल कायम ठेवला आहे.त्यामुळे संगमनेर येथील प्रथमवर्ग न्यायालयात इंदुरीकर महाराज यांच्याविरोधात खटला पुढे चालू ठेवण्यात येणार असून त्यांना न्यायालयात हजर राहण्याचे समन्स बजाविण्यात आले. मात्र याहीवेळी इंदोरीकर हजर झालेच नाही.





