अहमदनगर – गंगामाई कारखाना इतरांबरोबर ऊसदर देणार – मुळे

शेवगाव – मागील दोन्ही हंगामामध्ये ऊस लागवड क्षेत्र मोठ्या प्रमाणात वाढलेले असतानाही गंगामाई कारखान्याने परिसरातील सर्व शेतकऱ्यांच्या उसाचे वेळेत गाळप केले. यंदाही कारखान्याचे गाळप उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी सर्वांनी आपला ऊस गंगामाई कारखान्यास देऊन सहकार्य करावे, असे आवाहन करून गंगामाई परिसरातील इतर कारखान्याच्या बरोबरीने ऊसदर देईल, असे कारखान्याचे कार्यकारी संचालक रणजित मुळे यांनी जाहीर केले.
तालुक्यातील गंगामाई साखर कारखान्याच्या 13व्या गळीत हंगामाचा प्रारंभ अध्यक्ष तथा मुळे उद्योगसमूहाचे संस्थापक पद्माकरराव मुळे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यकारी संचालक रणजित मुळे, संचालक समीर मुळे, पार्थ मुळे यांच्या उपस्थितीत मुख्य शेतकी अधिकारी श्री व सौ वैशाली संदीप मनाळ यांच्या हस्ते गव्हाण व मोळीची विधिवत पूजा करून झाला. या वेळी ते बोलत होते .
कार्यकारी संचालक मुळे म्हणाले की, यंदाच्या हंगामात पाऊस कमी असल्यामुळे ऊस लागवड क्षेत्रात घट झाली असून, ऊस उत्पादनातही घट होण्याची शक्यता आहे. या हंगामामध्ये कार्यक्षेत्राबाहेरील कारखाने जादा भावाचे आमिष दाखवून ऊस मिळण्यासाठी प्रयत्न करतील. मात्र, आपल्या गंगामाई कारखान्यास ऊस देऊन सहकार्य करावे, असे आवाहन केले.
उपाध्यक्ष व्ही. एस. खेडेकर यांनी स्वागत केले. या वेळी विलासराव ढोरकुले, विष्णुपंत घनवट, सरपंच संभाजी घनवट, राजू गर्जे, मच्छिंद्र ढोरकुले, संजय टाकळकर, रणजित घुगे, प्रकाश घुगे, मदन मोटकर, संदीप मोटकर, कुंडलिक घुगे, कृष्णा ढोरकुले, डेव्हिड गंगावणे, सुरेश कटारिया, रावसाहेब लवांडे, बाळासाहेब फटांगरे, अमोल देवढे, मेजर अशोक भोसले, शिवाजी साबळे, लक्ष्मण टाकळकर, बबन खेडकर, परिसरातील ऊस उत्पादक शेतकरी, शेतकरी संघटनांचे पदाधिकारी, खातेप्रमुख, कामगार, कर्मचारी व अधिकारी उपस्थित होते.





