अहमदनगर: करोनामुळे एसटी बसमधून मालवाहतूक सुरू

प्रवासी वाहतूक बंद झाल्याने आर्थिक बळकटीसाठी एसटीने घेतला निर्णय
शशिकांत भालेकर
पारनेर – पारनेर येथील एसटी महामंडळाच्या आगारातील तीन प्रवासी बसचे रूपांतर मालवाहतूक वाहनात करण्यात आले आहे. करोनामुळे एसटी महामंडळ सध्या तोट्यात आहे. शासनाच्या नियमाप्रमाणे पन्नास टक्केच प्रवासी बसमध्ये वाहतूक करण्यात येत आहेत. त्यामुळे एसटी महामंडळ तोट्यात जात आहे. तसेच अनेक बस बंद असल्याने हा तोटा वाढत आहे. तो भरून काढण्यासाठी महामंडळाने राज्यभर मालवाहतूक करण्यासाठी ठराविक एसटी बसेस तयार केल्या आहेत.
पारनेर डेपोने जुलै 2020 पासून मालवाहतूक सेवा सुरू केली. सुरुवातीच्या काळामध्ये त्यास अत्यल्प प्रतिसाद मिळाला. मात्र सध्या या मालवाहतुकीला चांगला प्रतिसाद मिळत आहे. पारनेर आगारातील एकूण 53 एसटी बसपैकी तीन बसचे रूपांतर मालवाहतूक वाहनात करण्यात आले आहे. गरजेनुसार अजूनही या वाहनांची संख्या वाढवली जाणार असल्याची माहिती आगार व्यवस्थापकांनी दिली.
एसटी महामंडळाच्या प्रवासी बसचे मालवाहतूक वाहनात रूपांतर करण्यात आले. यामध्ये बसचे मागील सर्व सिट काढून मालभरण्यासाठी मागे एक दरवाजा बसवण्यात आला आहे. ज्या ठिकाणी खिडक्या होत्या तिथे पत्रा लावण्यात आला आहे. त्यामुळे बसमध्ये पाणी जाऊन आतील माल भिजणार नाही. तसेच बसच्या वरूनही प्लॅस्टिक कागदाचे आवरण बसवण्यात आले आहे.
या मालवाहतूक बसमध्ये नाशवंत वस्तू सोडून पशुखाद्य, लोखंडी सळ्या, कांद्यासह शेतमाल राज्यांतर्गत वाहतूक केला जात आहे. त्यासाठी 40 ते 45 रुपये किलोमीटर प्रमाणे आकारला जातो. त्याप्रमाणे एक लाखाला दोनशे पन्नास रुपयांचा अधिभार वेगळा घेतला जातो. या बसमध्ये दहा टनांपर्यंत मालवाहतूक केली जाते. करोना महामारीमुळे एसटीच्या उत्पन्नावर परिणाम झाला आहे. आताही मर्यादीत स्वरूपात प्रवासी वाहतूक केली जात आहे. त्यामुळे पर्यायी व्यवस्था म्हणून एसटीने मालवाहतुकीला सुरुवात केली आहे.
पारनेर डेपोला मालवाहतुकीसाठी चांगला प्रतिसाद मिळत आहे. ऑगस्टमध्ये शेतीमालाच्या 22 फेऱ्या करण्यात आल्या आहेत. 25 फेऱ्या इतर डेपोंतील गाड्यांना देण्यात आल्या आहेत. पुढील काळात सुरळीत प्रवासी वाहतूक सुरू झाली व त्यासोबत एसटीने ही माल वाहतूक सुरू ठेवली, तर झालेला तोटा कमी होण्यास मदत होईल.
पराग भोपळे, आगार व्यवस्थापक, पारनेर





