अहमदनगर – रखडलेली नुकसानभरपाई मिळावी शेतकऱ्यांचे तहसीलदारांना निवेदन

श्रीगोंदा, दि.२९ (प्रतिनिधी) – गेल्यावर्षी सप्टेंबर व ऑक्टोबर महिन्यात पूर व अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतकऱ्यांच्या नुकसानीची भरपाई काही शेतकऱ्यांना अद्याप मिळाली नसून ती लवकरात लवकर मिळावी, अन्यथा येथील तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.
तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात म्हटले की, गेल्यावर्षी सप्टेंबर व ऑक्टोबर महिन्यात पूर व अतिवृष्टीसारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेती पिकांचे अतोनात नुकसान झाले. त्याचे पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्याचा निर्णय शासनाने घेतला. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई मिळण्याबाबत महसूल विभागाकडे वेळोवेळी पाठपुरावा करूनही शेतकऱ्यांना अद्याप कोणतीही आर्थिक मदत मिळालेली नाही.
शेतकऱ्यांसमोर अडचणींचा विचार करून त्यांना तत्काळ नुकसान भरपाई मिळावी, अन्यथा ११ डिसेंबरपासून तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुरू करण्याचा इशारा देण्यात आला आहे. या निवेदनावर संतोष काळाणे, सचिन कापसे, मनोहर लबडे, बाळासाहेब वाजे, अंकुश लांडगे, बापू गाडेकर, सहादू लबडे, आकाश रासकर आदींच्या सह्या आहेत.





