अहमदनगर | पावसाच्या हुलकावणीने शेतकरी चिंतेत

शिर्डी – राज्यात अनेक ठिकाणी पावसाने दमदार हजेरी लावली आहे. मान्सून वेळेवर दाखल झाल्याने शेतकरी आनंदात आहे मात्र, शिर्डीत वरुणराजा रुसला की काय? अशीच परिस्थिती निर्माण झाली आहे.
गेली चार ते पाच दिवसांपासून आभाळ भरून येते मात्र पावसाचा पत्ताच नाही. एकीकडे भयंकर उकाडा तर दुसरीकडे पाऊस येण्याची चाहूल लागल्याने अनेक शेतकऱ्यांनी आपली शेती पेरणीसाठी नांगरून ठेवली आहे. बाजारपेठेत बी-बियाणे आणि खते खरेदीसाठी शेतकऱ्यांनी लगबग दिसून येत आहे. परंतु गेल्या काही दिवसांपासून पावसाने हुलकावणी दिल्याने शिर्डी आणि पंचक्रोशीतील शेतकरी चिंतेत सापडला आहे.
शिर्डी आणि पंचक्रोशीतील पेरू, डाळिंब, द्राक्ष यासारख्या फळबागा धोक्यात आल्या असून, भाजीपाला आणि इतर कडधान्याच्या बाजारपेठेत बाजारभाव चांगलेच वधारले आहेत. पाटबंधारे खात्याकडून गोदावरी कालव्यातून सोडण्यात आलेल्या अपुऱ्या आवर्तनाने शेतीच्या पाण्याचा प्रश्न मोठा गंभीर झाला आहे.
अनेक शेतकऱ्यांनी महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, आमदार आशुतोष काळे यांच्याकडे शेतीला पुरेस पाणी गोदावरी कालव्यातून द्यावे, अशी मागणी केली आहे. अर्थात निळवंडे धरण हे शेतकऱ्यांच्या शेतीची तहान भागवू शकते मात्र तिथेही समाधानपूर्वक पाऊस न झाल्याने धरणाने तळ गाठला आहे. नगर जिल्ह्यात दक्षिणेमध्ये समाधानपूर्वक पाऊस पडत असून उत्तर नगर जिल्ह्यात खासकरून शिर्डी आणि पंचक्रोशीतील शेतकरी पावसाने दिलेल्या हुलकावणीमुळे चिंतेत आहे.





