अहमदनगर | श्री किसनगिरीबाबांच्या पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान

नेवासा – आषाढी वारीनिमित्त पंढरपूर येथील देवगडच्या मठात होणाऱ्या पंचदिनात्मक पारायण सोहळयासाठी नेवासा तालुक्यातील देवगड येथील श्री समर्थ सदगुरू किसनगिरीबाबांच्या पालखीचे महंत भास्करगिरी बाबा व स्वामी प्रकाशानंदगिरी महाराज यांच्या नेतृत्वाखाली पंढरपूरकडे शनिवारी सकाळी प्रस्थान झाले.
प्रस्थानापूर्वी भगवान दत्तात्रयांसह श्री समर्थ सदगुरू किसनगिरी बाबांच्या मूर्तीचे पूजन महंत भास्करगिरी महाराज व उत्तराधिकारी स्वामी प्रकाशानंदगिरी महाराज यांच्याहस्ते करण्यात आले.यावेळी श्री दत्त मंदिरास प्रदक्षिणा घालण्यात आली.उपस्थित भाविकांनी पंढरपूरकडे निघालेल्या भास्करगिरी बाबा व स्वामी प्रकाशानंदगिरी महाराज यांचे देवगड, देवगडफाटा, नेवासाफाटा,नगर येथे संतपूजन करून स्वागत केले.
आषाढी वारी व एकादशीच्या पार्श्वभूमीवर पंढरपूर येथील देवगडच्या मठामध्ये दि.१४ ते १८ जुलै या कालावधीत पंचदिनात्मक नामदेव गाथा पारायण सोहळा महंत भास्करगिरी बाबांच्या मार्गदर्शनाखाली व स्वामी प्रकाशानंदगिरी महाराज यांच्या अधिपत्याखाली होत आहे. त्यानिमित्ताने रविवारी दि.१४ जुलै रोजी सकाळी ९ वाजता पंढरपूर येथील मठातून श्री समर्थ सदगुरू किसनगिरी बाबांच्या पालखीची क्षेत्र प्रदक्षिणा होणार आहे.
त्यामुळे या सोहळयातील सहभागी भाविक आपआपल्या वाहनांनी देवगडसह परिसरातून पंढरपूरकडे शनिवारी मार्गस्थ झाले. पंढरपूर येथील देवगडच्या मठात होणाऱ्या पंचदिनात्मक गाथा पारायण सोहळयामध्ये सकाळी व दुपारच्या सत्रात श्री नामदेव गाथा पारायण तसेच दुपारच्या व सायंकाळच्या सत्रात भोजन प्रसाद, रात्री ८ ते १० कीर्तन असे कार्यक्रम होणार आहे. दि.१८ जुलै रोजी भास्करगिरीजी बाबांच्या काल्याच्या कीर्तनाने पंचदिनात्मक नामदेव गाथा पारायण सोहळयाची सांगता होणार आहे.





