अहमदनगर – “माऊली माऊली “चा जयघोष करत नेवासे येथे दीपोत्सव साजरा

आळंदी येथून आणलेल्या पायी ज्योतीद्वारे दीपोत्सवाचा शुभारंभ
नेवासा – संत श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या ७२७ व्या संजीवन समाधी सोहळयाच्या निमित्ताने संत ज्ञानेश्वर माऊलींची कर्मभूमी ग्रंथराज ज्ञानेश्वरी व अमृतानुभव ग्रंथाचे रचनास्थान असलेल्या तीर्थक्षेत्र नेवासे येथील संत ज्ञानेश्वर महाराजांच्या मंदिरासमोर सोमवारी सायंकाळी ६.३० वाजता आळंदी येथून आणलेल्या पायी ज्योतीद्वारे दीपोत्सवाचा शुभारंभ करण्यात आला. या दीपोत्सवाने संत ज्ञानेश्वर माऊली मंदिराचे प्रवेशद्वार दिव्यांनी उजळून निघाले होते. माऊली माऊली नामाचा जयघोष करत उपस्थित भक्तांनी एक दीप लावून संजीवन समाधी सोहळयाच्या निमित्ताने माऊलींच्या स्मृतीस अभिवादन केले.
आळंदी येथून युवकांनी पायी चालत आणलेल्या माऊली ज्योतीचे सडा रांगोळ्या घालून व फटाक्यांची आतषबाजी करत नेवासेकरांनी स्वागत केले. ज्योतीने पैस खांबावर ठेवलेले दीप प्रज्वलित करण्यात येऊन मंदिरातील दिपोत्सवाचा शुभारंभ करण्यात आला. माऊली भक्तांच्या उपस्थितीत झालेल्या दीपोत्सवाच्या प्रसंगी माऊलींचे मूर्तिमंत रुप असलेल्या पैस खांबाचे पूजन संत ज्ञानेश्वर महाराज मंदिर देवस्थानचे अध्यक्ष पांडुरंग अभंग व उपस्थित संत- महंताच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ॐ आकाराच्या बनविण्यात आलेल्या प्रतिकृतीत दीप लावण्यात आले. त्यानंतर मंदिराच्या बाहेर असलेल्या प्रवेशद्वारावर ७२७ दीप प्रज्वलित करून माऊलींच्या स्मृतीस अभिवादन करण्यात आले.
आळंदी येथील गायनाचार्य हभप. बाळासाहेब वाईकर यांच्या सुश्राव्य वाणीतून भक्ती गीत गायनाचा कार्यक्रम झाला. उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा जीवन गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. समर्पण फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ.करणसिंह घुले यांनी उपस्थित भाविकांचे स्वागत करून प्रास्ताविक केले. याप्रसंगी संत ज्ञानेश्वर महाराज मंदिर देवस्थानचे विश्वस्त ज्ञानेश्वर माऊली शिंदे ,रामभाऊ जगताप, कृष्णाभाऊ पिसोटे, भिकाजी जंगले, कैलास जाधव, समर्पण फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ.करण घुले, सेवेकरी डॉ.संजय सुकाळकर, देविदास साळुंके ,डॉ.अशोक ढगे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
संत ज्ञानेश्वर महाराज मंदिरावर दीप प्रज्वलित करून तो लावण्यासाठी करजगाव येथील संत किसनगिरी भक्त मंडळ यांनी सेवा दिली. उपस्थित महिला भाविकांनी दीपोत्सवात सहभाग नोंदवला. यावेळी नेवासा तालुक्यातील वारकरी संप्रदायातील महाराज मंडळींसह भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. माऊलींच्या आरतीने दीपोत्सव कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.





