अहमदनगर – आयुष रुग्णालय लोकार्पणानंतरही बंद..!

नगर – राष्ट्रीय आयुष मिशन अंतर्गत केंद्र सरकारच्या वतीने सुमारे नऊ कोटी रुपये खर्चून उभारण्यात आलेल्या जिल्हा आयुष्य रुग्णालय बंदच असल्याचा दावा कॉंग्रेसने केला आहे. कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी रुग्णालयात जाऊन पाहणी केली. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना खोटी माहिती बंद अवस्थेतील रुग्णालयाचे ऑनलाइन लोकार्पण त्यांच्या हस्ते करू घेतल्याचा आरोप शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी केला.
काळे यांनी कॉंग्रेस कार्यकर्त्यांसह आयुष्य रुग्णालयाची ईन कॅमेरा पाहणी केली. यावेळी पंतप्रधान, पालकमंत्री, जिल्हा प्रशासनाच्या निषेधाच्या घोषणा कार्यकर्त्यांनी दिल्या. मागील महिन्यात 26 ऑक्टोबर रोजी शिर्डी येथे पंतप्रधान आले असतात त्यांनी ऑनलाईन प्रणालीद्वारे राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, पालकमंत्री, खासदारांच्या उपस्थितीमध्ये लोकार्पण केले होते. कॉंग्रेसने केलेल्या पाहणीमध्ये प्रत्यक्षात रुग्णालय बंद अवस्थेमध्ये आढळून आले.
कॉंग्रेसच्या पाहणीमध्ये रुग्णालयाच्या इमारतीमध्ये असणारे स्री पंचकर्म कक्ष, रक्त तपासणी प्रयोगशाळा, वैद्यकीय अधिकाऱ्यांची कक्ष, उपकर्म कक्ष, मेडिकल स्टोअर, अंतररुग्ण कक्ष, लेखा विभाग, बाह्यरुग्ण कक्ष, इलाज बीज तदबीर कक्ष, योगा बाह्यरुग्ण कक्ष, निसर्ग उपचार कक्ष, योग सभागृह, गर्भसंस्कार व हिरकणी कक्ष, शस्त्रक्रिया विभाग सर्वच बंद अवस्थेत आढळून आले. इमारतीमध्ये धुळीचे साम्राज्य असून आवारामध्ये प्लास्टिक, जागोजागी कचरा साचलेला आढळून आला. या ठिकाणी होमिओपॅथिक, आयुर्वेदिक, युनानी, योग अशा चार शाखांच्या उपचार पद्धती केंद्र सरकारच्या योजनेतून उभारण्यात उभारण्यात आल्या आहेत.
जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. घोगरे यांच्याशी काळे यांनी संपर्क साधला. सिव्हील हॉस्पिटल येथे जिल्हा आयुष अधिकारी डॉ. घुगे यांची भेट घेण्यात आली. यावेळी काळे यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना देखील जाब विचारला. 17 नोव्हेंबर पर्यंत भरतीसाठी अर्ज सादर करण्याची जाहिरात देण्यात आली होती. यामध्ये हजारो अर्ज आले आहेत. वास्तविक प्रशासनाने या बाबींची पूर्तता लोकार्पण होण्या पूर्वीच करायला हवी होती असे म्हणत काळे यांनी संताप व्यक्त केला. पुढील आठ दिवसांच्या आत भरती प्रक्रिया पूर्ण न केल्यास आंदोलनाचा इशारा दिला.





