अहमदनगर | अनिल कोते यूपीएससी परीक्षेत देशात सहावा

शिर्डी – मेहनत आणि चिकाटीच्या जोरावर प्रतिकूल परिस्थितीत शिर्डीतील शेतकऱ्याच्या मुलाने यशाचं मोठं शिखर गाठलं आहे. अनिल विष्णू कोते या युवकाने यूपीएससी परीक्षेत घवघवीत यश संपादन करत देशात सहाव्या क्रमांकाने उत्तीर्ण झाला आहे. त्याची निवड आर्थिक गुन्हे केंद्रीय शाखेच्या संचालकपदी दिल्ली येथे झाली. इतक्या मोठ्या पदी पोहचणारा शिर्डी येथील पहिला शेतकऱ्याचा मुलगा आहे.
विशेष म्हणजे यूपीएससी परीक्षेत यश मिळवणारा तो शिर्डीतील दुसरा तरुण आहे. लहानपणीच वडिलांचं छत्र हरपल असताना प्रतिकूल परिस्थितीत अनिलने शिर्डीत प्राथमिक शालेय शिक्षण घेऊन पुण्यात उच्च शिक्षण घेताना एमबीएची पदवी प्राप्त केली. पदवी घेतल्यानंतर आपल्या आयुष्याचे ध्येय उराशी बाळगून यूपीएससीचा अभ्यास सुरू ठेवला. पहिल्याच परीक्षेत त्यांना यश मिळालं. त्यांच्या या यशाबद्दल शिर्डीतील शिवसेनेचे जिल्हाप्रमुख कमलाकर कोते , राहुल गोंदकर, जयराम कांदाळकर यांच्यासह शिर्डी ग्रामस्थांनी अनिल कोते याचा सत्कार केला.
शिवसेना जिल्हाप्रमुख कमलाकर कोते म्हणाले की, जिद्द ,चिकाटी, मेहनत व अभ्यासात सातत्य ठेवले तर यश हमखास मिळते. विद्यार्थ्यांनी निराश न होता आपले अभ्यासाचे सातत्य सुरू ठेवत परीक्षा देत रहाव्यात. यश हमखास मिळते.





