Ahmednagar – निळवंडेतून अतिरिक्त दीड टीएमसी

कोपरगाव – निळवंडे डाव्या कालव्याच्या लाभ क्षेत्रातील सर्व गावातील पाझर तलाव भरले जावून पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटावा यासाठी आमदार आशुतोष काळे यांच्या सुरु असलेला पाठपुराव्यास यश मिळाले असून लाभ क्षेत्रातील सर्व गावातील पाझर तलाव भरण्यासाठी अतिरिक्त दीड टीएमसी पाणी देण्यास मान्यता देण्यात आल्याची माहिती आ. काळे यांनी दिली.
निळवंडे कालव्यांची चाचणी पूर्ण झाल्यामुळे कधी गावात पाणी येते,यासाठी लाभधारक क्षेत्रातील शेतकरी व नागरिक निळवंडे डाव्या कालव्याच्या पाण्याकडे डोळे लावून बसले होते.गुरुवारी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात कालवा सल्लागार समितीची बैठक झाली. या बैठकीसाठी लाभक्षेत्रातील असंख्य शेतकऱ्यांना समवेत घेवून आ. काळे या बैठकीला हजर होते.
या बैठकीत आ. काळे यांनी केलेल्या मागणीनुसार निळवंडे डाव्या कालव्याला अतिरिक्त दीड टीएमसी पाणी सोडण्यास मान्यता देण्यात आली असून निळवंडे डाव्या कालव्याच्या लाभक्षेत्रातील सर्व गावांतील पाझर तलाव भरुन दिले जाणार आहेत. त्याचा फायदा काकडी, मल्हारवाडी, डांगेवाडी, मनेगाव, रांजणगाव देशमुख, वेस, सोयेगाव, अंजनापूर, बहादरपूर, धोंडेवाडी, जवळके, शहापूर, बहादराबाद राहाता, चितळी, धनगरवाडी, वाकडी या जिरायती गावांना होणार आहे.





