अहमदनगर – मोबाइलवरून शिवीगाळ केल्याने तरुणाचा खून, तिघांवर गुन्हा दाखल

जामखेड – मोबाईल फोनवरून इतर व्यक्तीला फोनवर शिवीगाळ केली म्हणून दुसर्याच व्यक्तीच्या मारहाणीत तरुणाला नाहक आपले प्राण गमवावे लागले. मोबाईलवर फोनच्या बोलण्यावरून हा खून झाल्याने तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. ही घटना काल सायंकाळी बोर्ले ते जवळा रस्त्यावरील पठाडे वस्ती जवळ घडली. शिवाजी रामदास चव्हाण (वय ३२ रा. बोर्ले, ता. जामखेड) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी सुरेश बाबुराव पठाडे, आदित्य (उर्फ) गोपाल सुरेश पठाडे व एक अनोळखी (सर्व रा. जवळा फाटा, पठाडे वस्ती, जवळा. ता. जामखेड) या तीन जणांविरोधात जामखेड पोलीस स्टेशनला खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला..
जामखेड तालुक्यातील बोर्ले येथील मयत शिवाजी रामदास चव्हाण हा आपल्या नातेवाईकांसमवेत दि १३ डिसेंबर रोजी बोर्ले ते जवळा रोडवरील एका हॉटेलमध्ये गेले होता. सायंकाळी शिवाजी चव्हाण हॉटेलच्या बाहेर कोणाशीतरी फोनवर मोठ्याने बोलत शिवीगाळ करत होता. त्या ठिकाणी आरोपी सुरेश बाबुराव पठाडे हा आला. शिवीगाळ का करतो या कारणावरून दोघांमध्ये बाचाबाची होऊन जोराचे भांडण लागले.
सुरेश पठाडे हा त्याच्या हातातील गजाने व आदित्य (उर्फ) गोपाल सुरेश पठाडे व एक अनोळखी इसम असे तिघे जण शिवाजी यास मारहाण करत होते. यावेळी त्या ठिकाणी असलेले शिवाजीचे नातेवाईक तसेच आई वडील हे देखील भांडण सोडवण्याचा प्रयत्न करत होते. मात्र ,आरोपी हे ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. सुरेश पठाडेसह इतर आरोपींनी शिवाजीला गजाने व लाकडाने मारहाण केली व घटनास्थळाहून निघून गेले.
या मारहाणीत शिवाजी रामदास चव्हाण (वय ३२ रा. बोर्ले, ता. जामखेड) हा गंभीर जखमी झाला. शिवाजीच्या डोक्याला मार लागल्याने रक्तस्त्राव होत होता. यानंतर घटनेची माहिती समजताच फिर्यादी यांच्या भावाची मुले दिलीप चव्हाण व अंकुश चव्हाण हे घटनास्थळी आले. त्यांनी तातडीने खासगी वाहनाने जखमी शिवाजी यास जामखेड येथील खाजगी हॉस्पिटलमध्ये दाखल केले. मात्र, दि. १४ रोजी पहाटे ४ वाजता शिवाजी चव्हाण याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. मयत शिवाजी चव्हाण यांच्यावर जामखेड ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करुन मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे.
घटनेची माहिती मिळताच कर्जत उपविभागाचे पोलिस उपअधीक्षक शशिकांत वाखारे, जामखेडचे पोलीस निरीक्षक महेश पाटील यांनी तत्काळ घटनास्थळी भेट देवून पाहणी केली. तातडीने जामखेड पोलिसांनी तपास करीत दोन आरोपींना ताब्यात घेतले आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक महेश पाटील हे करीत आहेत.





