अहमदनगर – विधवा महिलेची एजंटाने केली फसवणूक

राहुरी – तालुक्यातील दवणगाव येथील सुवर्णा साळूंके या विधवा महिलेने पतीच्या आजारपणासाठी विकलेली जमीन परत खरेदी करण्याच्या उद्देशाने एका एजंटाजवळ पैसे गोळा करून दिले. मात्र, त्या एजंटने या महिलेची फसवणूक करून १० लाख ३१ हजार रुपये लुबाडले. याबाबत राहुरी पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गून्हा दाखल करण्यात आला.
सुवर्णा जालिंदर साळुंके ही विधवा महिला राहुरी तालुक्यातील दवणगाव येथे राहत असून शेती, दुध व्यवसाय व ब्युटी पार्लर व्यवसाय करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करते. सुवर्णा साळूंके यांना पतीच्या आजारपणासाठी विकलेली जमीन परत खरेदी करायची असल्याने त्यांनी देवळाली प्रवरा येथील एजंट आरोपी प्रशांत बापुसाहेब चव्हाण याला सांगितले. चव्हाण याने मी तुम्हाला जमीन परत खरेदी करून देतो, तुम्ही माझ्याकडे पैसे जमा करा. सुवर्णा साळूंके यांनी त्या एजंटवर भरवसा ठेवून त्याच्याकडे टप्याटप्याने ४ लाख २६ हजार रुपये फोन पेद्वारे पाठवले.
नंतर ६ लाख ५ हजार रुपये रोख स्वरुपात, असे एकूण १० लाख ३१ हजार रुपये दिले. त्यानंतर सुवर्णा साळूंके यांनी एजंट प्रशांत चव्हाण याला जमीन खरेदी करुन देण्याची मागणी केली. त्यावेळी त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. पुन्हा माझ्याकडे पैसे मागितले तर तुला जिवे ठार मारून टाकीन, अशी धमकी देऊन पैसे परत देण्यास टाळाटाळ करत सदर महिलेला १० लाख ३१ हजार रुपयांना गंडा घालून आर्थिक फसवणूक केली. सुवर्णा साळुंके यांनी दिलेल्या फिर्यादीवरून एजंट आरोपी प्रशांत बापुसाहेब चव्हाण (रा. देवळाली प्रवरा) याचेवर फसवणूक व जिवे मारण्याची धमकी दिल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला.




