अहमदनगर – आ. आशुतोष काळेंच्या सहकार्यातून हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी वाहन सेवा

कोपरगाव – मागील तीन वर्षापासून कोपरगाव मतदार संघातील दिव्यांग बांधवांना दिव्यांग प्रमाणपत्र मिळविण्यासाठी नगर येथे जाण्यासाठी कोपरगाव येथून वाहन सुविधा उपलब्ध करून देणाऱ्या आ. आशुतोष काळे यांनी नाशिक जिल्ह्यातील घोटी या ठिकाणी एस.एम.बी.टी. हॉस्पिटलमध्ये मतदारसंघातील रुग्णांना विविध आजारांवर मोफत उपचारासाठी देखील मोफत वाहन सेवा उपलब्ध करून दिली आहे.
दिव्यांग व्यक्तींसाठी राबविण्यात येणाऱ्या शासनाच्या विविध लाभदायी योजनांचा लाभ दिव्यांग व्यक्तींना घेण्यासाठी त्यांना दिव्यांग प्रमाणपत्राची आवश्यकता असते. हे प्रमाणपत्र मिळविण्यासाठी मतदारसंघातील दिव्यांग बांधवांना नगर येथील सिव्हील हॉस्पिटलमध्ये जावे लागत असे. कोपरगावपासून जवळपास १०० किलोमीटर असणाऱ्या सिव्हील हॉस्पिटलमध्ये जाणे हे दिव्यांग बांधवांसाठी व त्यांच्या पालकांसाठी मोठे दिव्यच होते. त्यामुळे दिव्यांग बांधवांना व त्यांच्या पालकांना होणारा त्रास कमी व्हावा तसेच दिव्यांग प्रमाणपत्र उपलबद्ध होऊन त्यांना शासनाच्या सोयी सुविधांचा लाभ मिळावा, यासाठी मागील तीन वर्षापासून दर महिन्याच्या पहिल्या बुधवारी आ.आशुतोष काळे यांनी दिव्यांग बांधवांना नगर येथे जाण्यासाठी करण्यात आलेली मोफत वाहन सेवा आजही अविरतपणे सुरु आहे.
या उपक्रमाची व्याप्ती वाढवताना आ.आशुतोष काळे यांनी या सेवेबरोबरच नाशिक जिल्ह्यातील घोटी येथील प्रसिद्ध असलेले एसएमबीटी हॉस्पिटल या ठिकाणी गरजू रुग्णांची मोफत तपासणी होऊन त्यांच्यावर मोफत उपचार व्हावेत, यासाठी मतदार संघातील रुग्णांना एसएमबीटी हॉस्पिटल येथे जाण्यासाठी मोफत वाहन सेवा उपलब्ध करून दिली आहे.
पहिल्याच बसमध्ये एकूण ४२ रुग्णांनी मोफत बससेवेचा लाभ घेतला आहे. या बसला एसएमबीटी हॉस्पिटलचे मार्केटिंग एक्झीक्युटिव्ह अक्षय मगर, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष आकाश डागा, माजी नगरसेवक मंदार पहाडे, दिनकर खरे, वाल्मिक लहिरे, संदीप कपिले, राजेंद्र आभाळे, शुभम लासुरे, गणेश बोरुडे, अजय ढमाले यांनी हिरवा झेंडा दाखवून रवाना करण्यात आले. या सर्व रुग्णांच्या विविध आजारांच्या सर्व तपासण्या मोफत करण्यात आल्या असून त्यांच्यावर मोफत उपचार करण्यात येणार आहे.





