अहमदनगर – आ. पवार अन् आ. तनपुरे यांच्या नावाचा आग्रह

नगर – राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या शरद पवार गटाने लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू केली असून अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघासाठी प्रभावी व प्रतिस्पर्धी भाजपचे खासदार डॉ. सुजय विखे यांच्या विरोधात लढणार तोलामोलाचा उमेदवार पाहिजे. त्यासाठी आमदार रोहित पवार व आमदार प्राजक्त तनपुरे यांच्या नावाचा आग्रह नगर जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांनी धरला.
शरद पवार यांच्या उपस्थितीत नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवारीबाबत चर्चा करण्यासाठी मुंबईत गुरुवारी जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावण्यात आली होती. त्यावेळी तोलामोलाचा उमेदवार द्यावा अथवा सामान्य चेहरा देण्याचा प्रयत्न करावा, अशी मागणी पदाधिकाऱ्यांनी केली. यावेळी पर्यायी उमेदवार म्हणून प्रताप ढाकणे,जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, दादा कळमकर, डॉ. अनिल आठरे यांच्या नावाचीही सूचना झाली. या बैठकीस प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील, खा. सुप्रिया सुळे, आ. जितेंद्र आव्हाड, अंकुश काकडे, आमदार प्राजक्त तनपुरे, दादा कळमकर, राहुल जगताप, प्रताप ढाकणे, अरुण कडू, संदीप वर्पे, अभिषेक कळमकर, अमित भांगरे, उपस्थित होते.लोकसभा निवडणुकीसाठी आत्तापासूनच कामाला लागा ‘राष्ट्रवादी आपल्या दारी’ उपक्रम लोकांपर्यंत पोहोचवा असेही शरद पवारांनी सांगितले.
तर आमदार नीलेश लंके यांना उमेदवारी
या बैठकीस आमदार नीलेश लंके समर्थक बाबाजी तरटे उपस्थित होते. तरटे हे पक्षाचे तालुकाध्यक्ष आहेत. त्यांनीच आमदार लंके आजही आपल्या सोबत असून शरद पवार यांनाच ते मानतात, त्यामुळे लोकसभा निवडणुकीत पक्षाने त्यांना संधी द्यावी अशी मागणी केली. त्यावर प्रदेशाध्यक्ष पाटील यांनी त्यांना आमच्या सोबत यायचे असेल तर दसऱ्यापर्यंत वेळ आहे, त्यानंतर विचार केला जाणार नाही, अशी भूमिका स्पष्ट केली. आ. लंके यांनी आपली भूमिका उघडपणे स्पष्ट केली पाहिजे, लपवून काही ठेवू नये असेही पाटील म्हणाले.
घुलेंची भूमिका अस्पष्टच
शेवगावचे माजी आमदार बंधू चंद्रशेखर घुले व नरेंद्र घुले यांचे समर्थक काकासाहेब नरवडे व कैलास नेमाने बैठकीस उपस्थित होते. मात्र ते स्वःत घुले बंधू उपस्थित राहिले नाही. त्यामुळे अजूनही घुले बंधूंची भूमिका अस्पष्टच असल्याचे चित्र आहे.





