अहमदनगर | जिल्ह्यात एका दिवसात ४४ मिलीमीटर पाऊस

गेल्या दोन -तीन दिवसांपासून जिल्ह्यातील विविध भागात पावसाचा जोर वाढला आहे. जिल्ह्यात शुक्रवारी (ता.२३) सरासरी ४४ मिलीमीटर पाऊस झाला. पाथर्डी तालुक्यात सर्वाधिक ७३ मि.मी. पाऊस झाला. नगर ६४ तर नेवासे आणि राहुरीमध्ये ५० मि.मी. पाऊस झाला. जिल्ह्यात आतापर्यंत सरासरीच्या १६८ टक्के पाऊस (४७० मिलीमीटर) झाला आहे. जिल्ह्यातील नद्यांमधून मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू करण्यात आला आहे.
१ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान
जिल्ह्यात दि.१८ ते २२ या दरम्य़ान झालेल्या पावासाने १ हजार १७० हेक्टर खरीप पिकांचे नुकसान झाले आहे. मूग, उडिद, बाजरी, कपाशी या पिकांचे नुकसान झाले. श्रीगोंदे तालुक्यात सर्वाधिक १ हजार १३५ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले. नगर तालुक्यातील तीन गावांमधील ३५ हेक्टर पिकांचे नुकसान झाले. नऊ घरांची अंशतः पडझड झाली. नगर ४, राहुरी २, अकोले, श्रीरामपूर आणि संगमनेर प्रत्येकी एका घराचे नुकसान झाले. शुक्रवारी (दि.२३) रोजी झालेल्या पावसाने नुकसानीचा आकडा वाढणार आहे. जिल्हा प्रशासनाने पंचनामे करण्याचा आदेश दिला आहे.
जिल्ह्यातील धरणांचा पाणीसाठा (दलक्षफू) (कंसात टक्केवारी)
भंडारदरा – १०,९८७ (९९.५३), मुळा- २४,५८८ (९४.५७), निळवंडे- ७,३४७ (८८.३१), आढळा- १,०६० (१००), मांडओहळ- ३४(८.६०), सीना-१,४०४ (५८.५०), खैरी-४५१ (८४.५८), विसापूर- ९०५ (१००)
या धरणातून विसर्ग
भिमा नदी – दौंड पूल विसर्ग (मॅन्युअल गेज)- ६,०३४ क्युसेक., गोदावरी नदी – नांदूर मधमेश्वर धरण विसर्ग – १५,७७५ क्युसेक, प्रवरा नदी – भंडारदरा धरण विसर्ग – १८,०६० क्युसेक, निळवंडे धरण विसर्ग – २२,२२० क्युसेक, ओझर बंधारा विसर्ग – १,७३८ क्युसेक, घोड नदी – घोड धरण विसर्ग – ६,८९० क्युसेक, मुळा नदी – मुळा धरण विसर्ग – २,००० क्युसेक,





