अहमदनगर : जायकवाडी धरणाचे 16 दरवाजे अर्ध्या फुटाने उघडले

गोदाकाठ पुरक्षेत्रातील नागरिकांना सुरक्षितस्थळी जाण्याचे आवाहन
शेवगाव (प्रतिनिधी) – जायकवाडी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने जलाशयाचा साठा 99 टक्क्यांवर पोहचला आहे. आज सायंकाळी सहाला नांदूरमधमेश्वरमधून 4 हजार 354, तर मुळा धरणातून 2 हजार क्यूसेक्स पाण्याचा विसर्ग गोदावरी पात्रात होत असल्याने जायकवाडीच्या 27 वक्री दरवाजांपैकी 16 दरवाजे अर्धा फुटाने उघडून 9 हजार 973 क्यूसेक्स प्रतिसेंकद विसर्ग गोदावरी नदीपात्रात सोडण्यात आला आहे.
गोदाकाठच्या गावांतील नागरिकांना प्रशासनाने सुरक्षित स्थळी जाण्याचे आवाहन केले असून, स्थानिक पाणलोट क्षेत्रात अनेक ठिकाणी जोरदार पावसाने हजेरी लावली. या पावसाचे पाणी नाथसागरातच येत असल्याने रविवारी रात्री 10 वाजेदरम्यान धरणाचे आणखी आठ दरवाजे तातडीने अर्धा फुटाने उचलून गोदावरीत विसर्ग वाढविण्यात आला होता.
त्यामुळे धरणाच्या 12 दरवाजांतून गोदावरी पात्रात 6288 असा विसर्ग होत होता. आज पाण्याची आणखी आवक वाढल्याने धरणाचे 16 दरवाजे अर्धा फुटाने उचलून 8 हजार 384 क्यूसेक्स व जलविद्युत केंद्रातून 1 हजार 589 क्यूसेक्स, असा 9 हजार 973 क्यूसेक्स पाण्याचा विसर्ग गोदावरी नदीपात्रात सोडण्यात आला आहे. त्यामुळे गोदावरी नदीला पूर आला असून, गोदाकाठ पूरक्षेत्रात येणाऱ्या नागरिकांना सुरक्षित स्थळी जाण्याचे आवाहन अधीक्षक अभियंता राजेंद्र काळे यांनी केले आहे.





