अहमदनगर – शिक्षक संघासाठी 10,555 अर्ज

नगर – विधानपरिषदेच्या नाशिक विभाग शिक्षक मतदार संघासाठी जिल्हा निवडणूक शाखेकडे आज अखेर 10 हजार 555 मतदार अर्ज प्राप्त झाले आहेत. या सर्व अर्जांची पडताळणी पूर्ण झाली आहे. एकही मतदार अर्ज बाद झाला नाही, अशी माहिती निवडणूक उपजिल्हाधिकारी राहुल पाटील यांनी दिली. तसेच 23 नोव्हेंबर ते 9 डिसेंबर दावे हरकती मागण्यात येणार आहे.
नाशिक विभाग शिक्षक मतदारांसाठी माध्यमिक आणि महाविद्यालयातील शिक्षक मतदार होण्यासाठी पात्र आहेत. जिल्ह्यात माध्यमिक आणि महाविद्यालयांची संख्या 1 हजार 239 आहे. जिल्ह्यामध्ये 15 हजार 669 शिक्षक कार्यरत आहेत.
शिक्षणाधिकाऱ्यांमार्फत सर्व शिक्षकांसाठी मतदार नोंदणी अर्जांचे वितरण करण्यात आले आहे. निवडणूक विभागाकडे 10 हजार 555 अर्ज प्राप्त झाले आहेत. सर्व अर्जांची पडताळणी पूर्ण झाली आहे. संगमनेर तालुक्यातून सर्वाधिक 1 हजार 317 अर्ज प्राप्त झाले. जामखेड तालुक्यातून सर्वाधिक कमी 261 अर्ज प्राप्त झाले. माध्यमिकचे मुख्याध्यापक किंवा महाविद्यालयांचे प्राचार्य यांनी प्राधिकृत केलेल्या व्यक्तीमार्फत संबंधित विद्यालयातील शिक्षकांचे एकगठ्ठा मतदार नोंदणी अर्ज तहसील कार्यालयात दाखल करण्याची परवानगी देण्यात आली.





