अहमदाबाद :- ऑस्ट्रेलियातील व्हिक्टोरियात येत्या 2026 सालच्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा होणार होत्या. मात्र, निधिअभावी व्हिक्टोरियाने आयोजनपद सोडल्याचे जाहीर केले. आता ही स्पर्धा भारतात होण्याची शक्यता बळावली आहे. गुजरातमधील अहमदाबादमध्ये ही स्पर्धा होऊ शकते व त्यासाठी भारतीय ऑलिम्पिक संघटना गुजरात सरकारच्या संपर्कात आहे.
जर गुजरात सरकारने याला मंजुरी दिली तर भारतात ही स्पर्धा दुसऱ्यांदा आयोजित केली जाइल. यापूर्वी 2010 साली दिल्लीत ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. व्हिक्टोरियाने यजमानपद सोडल्यावर राष्ट्रकुल क्रीडा महासंघ नव्या आयोजकाच्या शोधात असून येत्या महिनाअखेरीस त्यांच्याकडे भारताकडून प्रस्ताव जाऊ शकतो असेही संकेत संघटनेने दिले आहेत.
गुजरात सरकार 2030 सालच्या राष्ट्रकुल आणि 2036 ऑलिम्पिक स्पर्धांच्या आयोजनासाठी संघटनेशी चर्चा करत आहे. तसेच 2028 सालापर्यंत गुजरात सरकार अहमदाबादमध्ये पायाभूत सुविधा निर्माण करण्याच्या योजनेवर काम करत आहे. 2026 सालच्या राष्ट्रकुल स्पर्धेसाठी तयारी दर्शवली गेली तर गुजरात सरकारला या सर्व सुविधा 2 वर्षे अगोदर पूर्ण कराव्या लागतील.
भारताचा दावा जास्त भक्कम…
2026 सालच्या स्पर्धेचे यजमानपद मिळण्यात अहमदाबादला फारशी अडचण येणार नाही. व्हिक्टोरियाने नकार दिल्यानंतर इतक्या कमी कालावधीत भारताव्यतिरिक्त अन्य यजमान मिळणे राष्ट्रकुल महासंघालाही शक्य वाटत नसल्याचे समोर येत आहे.
राष्ट्रकुल सदस्य देशांचा विचार करता, सध्या युक्रेन युद्धामुळे आर्थिक अडचणित आहेत. अशा स्थितीत भारताचा दावा जास्त भक्कम बनेल असे चित्र सध्यातरी दिसत आहे.