नवी दिल्ली – कॉंग्रेसचे वरिष्ठ नेते अहमद पटेल यांची त्यांच्याच घरी सक्तवसुली संचलनालयाच्या वतीने दुसऱ्यांदा चौकशी करण्यात आली. संदेसरा बंधूंच्या बॅंक गैरव्यवहार आणि मनी लॉन्डरिंग प्रकरणी सुरू असलेल्या तपासाचा भाग म्हणून ही चौकशी करण्यात आली, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
“ईडी’चे तीन अधिकारी आणि अन्य काही अधिकारी सकाळी 10.30 वाजता पटेल यांच्या 23 मदर तेरेसा क्रेसेन्ट येथील निवासस्थानी दाखल झाले. या सदस्यांच्या हातामध्ये फायली होत्या आणि त्या सर्वांनी करोनाच्या साथीमुळे खबरदारीचा उपाय म्हणून मास्क आणि हातमोजे घातलेले दिसत होते.
“ईडी’च्या पथकाने 27 जून रोजी याच प्रकरणी त्यांच्या निवासस्थानी सुमारे 7 तास चौकशी केली होती.
करोनाच्या साथीमुळे लागू करण्यात आलेल्या मार्गदर्शक सूचनांमध्ये ज्येष्ठ नागरिकांनी घराबाहेर जाऊ नये, असे म्हटलेले आहे. त्यामुळे “ईडी’च्या कार्यालयात येण्यास अहमद पटेल यांनी नकार दिला होता. त्यामुळे घरीच येऊन चौकशी करण्यास अधिकाऱ्यांनी तयारी दर्शवली होती. या चौकशी -दरम्यान पटेल यांनी दिलेला जबाब “पीएमएलए’ कायद्याखाली नोंदवला जात आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
वडोदरातील स्टर्लिंग बायोटेक आणि या कंपनीचे मुख्य प्रवर्तक आणि संचालकांच्या 14,500 कोटी रुपयांच्या कर्ज गैरव्यवहाराचा तपास “ईडी’द्वारे केला जात आहे. हे सर्व संचालक सध्या फरार आहेत.