नेवासे : जिल्ह्याचे मिनी मंत्रालय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या नगराध्यक्ष आणि पंचायत समितीच्या सभापतीपदाचे नुकतेच आरक्षण जाहीर झाल्यामुळे राजकीय आखाड्यात आता मोठी रंगत आलेली आहे. आगामी निवडणुकींचे राजकीय चित्र स्पष्ट झाल्यामुळे त्यादृष्टीने आता इच्छुक मंडळी निवडणूक आखाड्यात आपले बस्तान बसविण्यासाठी सरसावली आहे. नेवासे पंचायत समितीचे आरक्षण हे ओबीसी प्रवर्गासाठी जाहीर झाल्यामुळे आणि नेवासे नगरपंचायतीचे नगराध्यक्षपद हे सर्वसाधारण जागेसाठी असल्यामुळे आता या दोन्हीही जागेसाठी इच्छकांची मोठी भाऊगर्दी होणार असल्यामुळे सर्वपक्षीय नेत्यांची कसरत पणाला लागणार आहे. अनेकांना आता भावी ‘नगराध्यक्ष’ आणि ‘सभापती’ होण्याचे ‘डोहाळे’ लागल्यामुळे त्यांना आवरण्यासाठी राजकीय नेतेमंडळींची प्रतिष्ठा पणाला लावून बंडोबांना ‘थंडोबा’ करण्यासाठी राजकीय जादू चालवावी लागणार आहे.नगराध्यक्षपदाची निवडणूक लढविण्यासाठी शहरात अनेकजण एकमेकांचे प्रतिस्पर्धी उमेदवार म्हणून रिंगणात उतरण्यासाठी इच्छुक दिसत असले तरी प्रमुख जनाधार असलेल्या मंडळीतच तगडी फाईट होणार आहे. जनाधार असलेल्या मंडळींच्या विरोधात काही हौशी ‘बंडोबा’ उतरवून मतांचे विभाजन करुन आपलाच उमेदवार विजयी करण्यासाठी प्रमुख सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये पडद्याआडून व्यूहरचना आखून मतांचे विभाजन करण्याची चाल खेळली जाणार आहे. नेवासे पंचायत समितीचे सभापतीपद हे ओबीसी प्रवर्गाकडे आरक्षित झाल्यामुळे आता पंचायत समिती सभापतीपदाच्या शर्यतीतही अनेक इच्छुकांच्या नजरा या पदाकडे लागलेल्या आहेत. त्यादृष्टीने इच्छुकांनी आपली रणनिती आखण्यात सुरुवात केल्यामुळे राजकीय नेतेमंडळींना या इच्छुकांनाही आता आवर घालून जनमतातील दावेदारांची मतविभागणी थांबविण्यासाठी कसरत करावी लागणार आहे. सत्ताधारी आणि विरोधी मंडळींकडे इच्छुकांचा भरणा झालेला आहे. या निवडणुकीत आपापल्या कार्यकर्त्यांना आवर घालून विरोधी उमेदवारांच्या मतविभागणीला कसा फटका बसेल? आणि त्यांच्या विरोधात त्यांच्याच तालमीतला उमेदवार उभा करून पडद्याआडून अशी खेळी करण्यासाठी नेतेमंडळींचा राजकीय फडात अभ्यास सुरु झालेला आहे. त्यामुळे आता काही इच्छुक बंडोबांपेक्षा आपल्याच पक्षातील जनमतातील उमेदवारांचे विरोधी राजकीय पार्टीकडून मतांचे खच्चीकरण करण्याचा डाव मांडत आहे. राजकीय आखाड्यात होणाऱ्या निवडणुकीत गुलाल घेण्यासाठी व्यूहरचना आखण्याचे काम युद्ध पातळीवर गुप्तपणे सुरू झालेले आहे. इच्छुक जनाधारातील मंडळींना राजकीय रणांगणात हैराण करण्याची नामी शक्कल आखण्याचे काम या निवडणुकीच्या माध्यमातून सुरू झाल्यामुळे सुज्ञ मतदार या खेळीला उधळून लावणार की विरोधकांची जादू चालणार, याकडे राजकीय निरीक्षकांचे मोठे लक्ष लागून आहे.