प्रतिनिधी – विजय बाविस्कर Ahilyadevi Holkar : पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर (Ahilyadevi Holkar) यांच्या त्रिशताब्दी जयंतीनिमित्त जलसंपदा विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या “गोदा ते नर्मदा” जलयात्रेचे २८ एप्रिल रोजी खान्देशाचे प्रवेशद्वार असलेल्या चाळीसगावात जल्लोषात स्वागत करण्यात आले. त्र्यंबकेश्वर आणि चौंडी येथून सुरू झालेली ही जलयात्रा जलसंवर्धन आणि पर्यावरण रक्षणाचा संदेश घेऊन शहरात दाखल झाली. भव्य स्वागत सोहळा कन्नड घाटाच्या पायथ्याशी असलेल्या दस्तुरी फाटा येथे जलयात्रेचे आगमन होताच बंजारा समाजाच्या वतीने पारंपारिक पद्धतीने स्वागत करण्यात आले. यावेळी विविध लोकप्रतिनिधी, संत-महंत आणि हजारोंच्या संख्येने जलयात्री उपस्थित होते. त्यानंतर नागद रोड चौफुलीमार्गे ही यात्रा शहरात आली. पाटणादेवी रोडवरील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मारकाला अभिवादन केल्यानंतर, घाट रोडमार्गे छत्रपती शिवाजी महाराज चौकात यात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले. Ahilyadevi Holkar जलजागृतीचा जागर या निमित्ताने आयोजित जाहीर सभेत मान्यवरांनी अहिल्यादेवी होळकर यांच्या जलव्यवस्थापनाच्या आदर्शावर प्रकाश टाकला. “पाणी वाचवा, पाणी साठवा” या संदेशासह दुष्काळमुक्त महाराष्ट्राचा संकल्प यावेळी व्यक्त करण्यात आला. ही जलयात्रा केवळ एक उपक्रम नसून जलसंधारणासाठी समाजमनात जागृती निर्माण करणारी एक व्यापक चळवळ असल्याचे मत यावेळी व्यक्त झाले. सिंचन प्रकल्पांचा आढावा सभेदरम्यान स्थानिक सिंचन प्रकल्पांच्या सद्यस्थितीबाबतही माहिती देण्यात आली. विशेषतः नारपार प्रकल्प आणि वरखेडे-लोंढे बॅरेज प्रकल्पामुळे सुमारे १८ हजार हेक्टर क्षेत्राला सिंचनाचा लाभ मिळणार असल्याचे सांगण्यात आले. प्रलंबित प्रकल्पांना गती देऊन शाश्वत पाणी पुरवठा करण्यावर भर दिला जात असल्याचेही यावेळी स्पष्ट करण्यात आले. आकर्षक रथ आणि सहभाग या जलयात्रेत काशी विश्वनाथ मंदिराची प्रतिकृती, १३० नद्यांचे पाणी असलेला पवित्र जलकलश आणि अहिल्यादेवी होळकर यांची प्रतिमा असलेले रथ नागरिकांच्या आकर्षणाचे केंद्र ठरले होते. धनगर समाजाच्या वतीने मान्यवरांचा पारंपरिक धनगरी घोंगडी आणि काठी देऊन सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.