Ahaan Panday Birthday: ‘मला तुझा अभिमान आहे…’ अहान पांडेच्या वाढदिवसानिमित्त अनीत पड्डाची भावनिक पोस्ट

Ahaan Panday Birthday: सुपरहिट चित्रपट ‘सैयारा’मुळे चर्चेत आलेला अभिनेता अहान पांडे आज आपला 28वा वाढदिवस साजरा करत आहे. या खास दिवशी त्याची मैत्रीण आणि सहकलाकार अनीत पड्डा हिने सोशल मीडियावर अहानसाठी भावनिक पोस्ट लिहिली आहे. अनीतने इंस्टाग्रामवर अहानसोबतचे जुने फोटो शेअर करत त्याच्या स्वभावाचे मनापासून कौतुक केले.
अनीतने आपल्या पोस्टमध्ये सांगितले की अहान फक्त एक अभिनेता नाही, तर तो विचारांनी खूप खोल आणि निस्वार्थ व्यक्ती आहे. तिने लिहिले, “मी भविष्य पाहिलं आहे. जेव्हा तू मनापासून हसतोस, तेव्हा आजूबाजूचे लोकही नकळत हसतात.” अहानच्या नोटपॅडमध्ये लिहिलेल्या विचारांना तिने “दुर्मिळ आणि जादुई” असे म्हटले. त्याचप्रमाणे, साध्या गोष्टींमध्येही सौंदर्य शोधण्याची त्याची दृष्टी खास असल्याचे तिने सांगितले.
View this post on Instagram
अनीतने अहानच्या कुटुंबाबद्दलही लिहिले. त्याच्या आई-वडिलांना अहानवर खूप विश्वास असल्याचे तिने सांगितले. व्हिडीओ कॉलमध्ये ते नेहमी त्याची काळजी विचारतात. तसेच, अहानच्या आईला आपल्या मुलाचा अभिमान वाटतो आणि पोस्टर पाहून ती अनेकदा भावुक होते, असेही अनीतने नमूद केले.
पोस्टच्या शेवटी अनीतने लिहिले, “तू नेहमीच एक स्टार होतास. जग थांबून तुला पाहतंय. मला नेहमी तुझा अभिमान वाटेल. वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा, अहान.”
‘सैयारा’च्या यशानंतर अहान आणि अनीत यांची ऑनस्क्रीन आणि ऑफस्क्रीन केमिस्ट्री प्रेक्षकांना विशेष भावली असून चाहत्यांमध्येही त्यांची जोडी लोकप्रिय ठरत आहे.





