माझा बाप शेतकरी उभ्या जगाचा पोशिंदा… असे शेतकऱ्यासाठी म्हंटले जाते. ते खऱ्या अर्थाने सार्थ ठरले आहे. बाहेर संपूर्ण जगाला हादरवून टाकणारा करोना विषाणू घोंगावत होता. या करोनाच्या लढाईत जनतेच्या अन्नाची भूक भागविण्यासाठी शेतकरी तहानभूक विसरून गेली अडीच महिने शेतात राबत आहे. या करोनाच्या लढाईत समाजासाठी राबणारा तो खऱ्याअर्थाने कोव्हिड योद्धा ठरला आहे…. ऊ न असो की वारा, पावसाळा असो की कडाक्याची थंडी बळीराजाला कधीच उसंत नसते. एक बी पेरावी आणि त्यामधून हजारो बियांची उत्पत्ती व्हावी या सूत्राने तो आयुष्यभर काळ्या आईची सेवा करीत असतो. कधी निसर्गाची अवकृपा, कधी शेतमालाचे घसरलेले दर या साऱ्यावर मात करत शेतकरी रोज नव्याने घाम गाळत असतो. स्वत:च्या मनगटावर शिवार हिरवगार करत असतो. सध्या करोनाच्या संकटामुळे सर्वत्र लॉकडाऊन लागू करण्यात आलं. बाजारपेठा बंद झाल्या, वाहतूक ठप्प झाली. मात्र, हा जगाचा पोशिंदा मात्र थांबला नाही. “आपला जन्म जगाच्या उद्धारी’ ही खूणगाठ मनाशी पक्की करत शेताची मशागत करू लागला. यंदातरी निसर्ग साथ देईल, या अपेक्षेने तो शेतीच्या नव्या हंगामाच्या तयारीला लागला आहे. जगाचा पोशिंदा ठरलेल्या या शेतकरी वर्गाला राज्यकर्त्यांकडून माफक अपेक्षा आहेत. शेतमालाला रास्त भाव, कमी किंमतीत बी-बियाणे आणि शेतीसाठी माफक दरात मुबलक वीज पुरवठा या तीन घटकांवरती वर्षानुवर्षे त्याचा संघर्ष सुरूच आहे. भारत हा कृषीप्रधान देश आहे. या देशात 70 टक्के जनता ही शेतकरी आहे. आजच्या घडीला विचार करता करोनासारखे संकट महाराष्ट्रात आणि देशात ठाण मांडून बसले आहे. तरीही येथील जनता अन्नधान्याच्या बाबतीत सक्षम आहे. एकही माणूस आजही उपाशी मरत नाही. याचे सर्व श्रेय बळीराजाला जाते. कारण लॉकडाऊनच्या काळातही बळीराजाने आपले काम थांबवले नाही. त्यामुळे आज देशात असो वा राज्यात सर्वांनाच मुबलक अन्न उपलब्ध झाले आहे. ही किमया फक्त शेतकरी करू शकतो. श्रीमंताकडील पैशाचा आज काही उपयोग होताना दिसत नाही. संकटाच्या काळात जगण्यासाठी आवश्यक असणारे धान्य आज केवळ बळीराजाने उपलब्ध करून दिले आहे. याची जाण प्रत्येकाला असणे आवश्यक आहे. माझा बाप शेतकरी उभ्या जगाचा पोशिंदा असे म्हंटलयं ते शंभर टक्के सार्थ आहे. शेतकऱ्यांवर नेहमीच अन्याय होत आला आहे. त्याच्या मालावर मिळणारा कमी भाव हमी भावात कधी बदलेल याची तो वाट बघतोय. त्याला शासनाकडून मिळणाऱ्या सुविधा अल्प आहेत. मात्र, आम्ही सर्वजण त्याच्याकडून खूप मोठी अपेक्षा करता आहोत. ती अपेक्षा पूण पूर्ण करण्यासाठी बळीराजाला बळ देणे गरजेचे आहे. केवळ बळीराजा म्हणून चालणार नाही. तो बळीराजा कसा बनेल याच्याकडे सर्वांनी लक्ष देवून त्याला आवश्यक असणाऱ्या सर्व पुरेशा सुविधा देणे गरजेचे आहे. तो जगला तर आपण जगणार आहोत. याची जाण आणि भान ठेवून बळीराजाला बळ दिले तरच यापुढे जगाचा पोशिंदा म्हणून तो टिकू शकेल. गेली अनेकवर्षे बळीराजा निसर्गाच्या चक्रव्युहात अडकला आहे. तरीही येणाऱ्या प्रत्येक संकटाला छेद देत तो मार्ग काढीत आहे. सध्याच्या करोनामुळे निर्माण झालेल्या लॉकडाऊनच्या काळात प्रत्येकजण आपल्या घरात शांत बसला होता. त्या प्रत्येक कुटूंबाला जीवनावश्यक असणारा भाजीपाला पुरविण्यासाठी मात्र, तो रस्त्यावर उतरला होता. सर्वांच्या गरजा भागविण्यासाठी आयुष्यभर काबाडकष्ट करणारा हा बळीराजा खऱ्याअर्थाने जगाचा पोशिंदा आहे. गतवर्षी अतिवृष्टी तर यंदा करोनाचे संकट त्यामुळे अनेक व्यवसाय अडचणीत आले आहेत. सर्वात जास्त फटका शेती व्यवसायाला बसला. गतवर्षी अतिवृष्टी व परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचे खूप नुकसान केले. अनेक दिवस शेती पाण्यात राहिल्याने जमिनीत ओलावा तसाच होता. त्यामुळे गतवर्षीचा खरीप हंगाम पूर्णत: वाया गेला. खरीपातील भुईमूग, सोयाबिन, कडधान्ये आदी पिकांचा फटका तर बसलाच शिवाय पैशांचे पीक असणाऱ्या ऊसाचेही मोठे नुकसान शेतकऱ्यांना सोसावे लागले. पश्चिम महाराष्ट्र हा सुजलाम् सुफलाम म्हणून ओळखला जातो. बागायत क्षेत्राचे प्रमाण अधिक त्यामुळे पाण्याची टंचाई फारशी कधी जाणवत नसल्याचे शेतीतून उत्पन्नही चांगल्या प्रमाणात मिळते. मात्र, गतवर्षी अतिवृष्टीमुळे सर्व पिके वाया गेली होती. खरीप हंगामानंतर रब्बी हंगाम तरी हाताशी लागेल अशी आशा होती मात्र, त्याही हंगामात म्हणावे इतके उत्पादन शेतकऱ्यांना मिळाले नाही. रब्बी हंगामातील पिकांची काढणी सुरू असतानाच करोनाचे महासंकट ओढावले. संपूर्ण देशात लॉकडाऊन पुकारल्यामुळे सर्व उद्योग बंद करावे लागले. अनेकांना घरीच बसावे लागले. नेमका याच कालावधीत रब्बी हंगामातील पिके काढण्याची हातघाई सुरू होते. मात्र, बाजारपेठ बंद असल्याने घरी असणाऱ्यांना जीवनावश्यक साहित्याची टंचाई भासू लागली. बाहेर संकट घोंगावत असतानाही त्याची तमा न बाळगता हा बळीराजा रस्त्यावर उतरला. गेली दोन ते अडीच महिने संपूर्ण जगाला जगवण्याचा विडा आजपर्यंत कायमच दुर्लक्षित ठरलेल्या या बळीराजाने उचलला. त्याला समस्येच्या गर्तेतून बाहेर काढून त्याला उभारी देण्यासाठी प्रत्येकानेच त्याच्या पाठीशी उभे राहणे ही आजची गरज आहे. यावर्षीच्या या जागतिक कृषी दिनाच्या पार्श्वभूमीवर किमान इथून पुढे तरी त्याला उभारी मिळो ही सदिच्छा…! आनंद जगदाळे (मसूर, प्रतिनिधी)