Agriculture News – तालुक्यातील हिरडस मावळ परिसरात यंदा गेल्या चार वर्षांच्या तुलनेत आंब्याला विक्रमी मोहोर लगडला होता. मात्र, गेल्या पंधरा दिवसांपासून सातत्याने बदलणाऱ्या हवामानाचा मोठा फटका आंबा पिकाला बसत आहे. ढगाळ वातावरणामुळे मोहोरावर रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने मोठी गळती सुरू झाली असून, हक्काचे पीक हातातून जाण्याच्या भीतीने आंबा उत्पादक शेतकरी प्रचंड चिंताग्रस्त झाला आहे. यंदा रब्बी हंगामात थंडीचे प्रमाण चांगले राहिल्याने आंब्याला मोठ्या प्रमाणावर मोहोर आला होता. हिरडस मावळ परिसरातील डोंगरदऱ्यांमधील आमराई बहरल्याने यंदा दुप्पट उत्पादनाची आशा शेतकऱ्यांना होती. परंतु, अचानक आलेल्या ढगाळ हवामानाने या आशेवर पाणी फिरवले आहे. या वातावरणामुळे मोहोरावर ‘चिकाटा’ आणि ‘तुडतुड्या’ सारख्या रोगांचा प्रादुर्भाव वाढला आहे. यामुळे मोहोर काळा पडून झडू लागला असून, उरलेला मोहोर वाचवण्यासाठी शेतकरी महागड्या औषधांची फवारणी करत शर्थीचे प्रयत्न करत आहेत. पुढील काळात हवामान असेच राहिल्यास आंब्याचे उत्पादन निम्म्यावर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. निसर्गाच्या या लहरीपणामुळे आर्थिक गणिते कोलमडण्याची भीती शेतकरी व्यक्त करत आहेत. आंबा उत्पादक शेतकरी चिंतेत चार वर्षात कधीच नव्हता असा यंदाच्या वर्षी मागील महिनाभरापासून आंब्यांना मोहोर फुलला होता. यंदा उत्पादन दुप्पट मिळेल आणि आर्थिक फायदा होईल याची आशा लागली होती. मात्र ढगाळ हवामानामुळे आंब्याचा मोहोर झडू लागल्याने उत्पन्नात मोठी घट होणार आहे. आता आहे त्या स्थितीत आंब्यांना मोहोर राहिला तर आंब्याचे उत्पादन बऱ्यापैकी मिळेल, असे हिरडस मावळातील शेतकरी धोंडीबा मालुसरे आणि जिजाबा पारठे यांनी सांगितले.