Agriculture News – राज्यात सध्या अनुभवायला मिळणाऱ्या थंडीच्या लाटेमुळे आणि बदलत्या हवामानामुळे आंबा पिकावर दुहेरी परिणाम होत आहे. अनेक ठिकाणी जुन्या मोहरावर फळधारणा झालेली असतानाच नवीन मोहरही येत आहे. अशा स्थितीत अन्नाचे वहन नवीन मोहराकडे होऊन वाटाणा किंवा गोटी आकाराची फळे अन्नद्रव्यांअभावी गळून पडत आहेत. ही फळगळ रोखण्यासाठी कृषी विभागाने शेतकऱ्यांसाठी विविध उपाययोजना सुचवल्या आहेत. फळगळ रोखण्यासाठी शेतकऱ्यांनी काय करावे ? १. विद्राव्य खताचा वापर:- आंब्याची फळे वाटाणा, गोटी किंवा अंडाकृती आकाराची असताना ‘१३:००:४५’ या विद्राव्य खताची १ टक्का म्हणजे १० ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणात फवारणी करावी. २. वनस्पती वाढ नियामकाचा वापर:- फळगळ कमी करण्यासाठी फळे वाटाणा व गोटीच्या आकाराची झाल्यावर ‘नॅप्थील ॲसिटिक ॲसिड’ (एन. ए. ए.) (४.५ टक्के डब्ल्यूडब्ल्यू) ४४. ४४ मिली प्रति १०० लिटर पाणी या प्रमाणात फवारणी करावी. ३. एन. ए. ए. ची फवारणी बहुतेक कीटकनाशकांसोबत चालत असली, तरी चांगले परिणाम मिळण्यासाठी त्याची स्वतंत्र फवारणी करणे अधिक फायदेशीर ठरते. पाणी व्यवस्थापन कसे असावे ? -पाऊस संपल्यावर झाडांना मोहर येईपर्यंत पाणी द्यायचे असते; अन्यथा मोहराऐवजी पालवी अधिक येऊन उत्पादन कमी येऊ शकते. -फळधारणा झाल्यानंतर साधारण १५ दिवसांच्या अंतराने प्रति झाड १५० ते २०० लिटर पाणी द्यावे. -फळधारणा झाल्यावर ३ ते ४ पाण्याच्या पाळ्या द्याव्यात. -आंबा फळे काढणीला येण्यापूर्वी एक महिना आधी झाडाला पाणी देणे बंद करावे.