Agricultural Scam : धनंजय मुंडेंच्या अडचणीत वाढ ! अंजली दमानियांकडून कृषी घोटाळ्याचे पुरावे एसीबीला सुपूर्त

मुंबई : सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी बुधवारी धनंजय मुंडे यांच्याविरोधातील कथित कृषी घोटाळ्याचे पुरावे एसीबी अर्थात अँटी करप्शन ब्यूरोला दिले. तसेच या पुराव्यांमुळे आता धनंजय मुंडे वाचणार नाहीत असा ठाम दावाही केला. त्यांच्या या दाव्यामुळे सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा माजी मंत्री धनंजय मुंडे यांचा पाय आणखी खोलात गेल्याचा दावा केला जात आहे.
दमानिया यांनी काही महिन्यांपूर्वी धनंजय मुंडे यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. त्यानंतर एसीबीने त्यांना या आरोपांचे पुरावे देण्याचा समन्स बजावला होता. त्यानुसार, दमानिया यांनी बुधवारी अँटी करप्शन ब्यूरोच्या येथील कार्यालयाला भेट देऊन धनंजय मुंडे यांच्याविरोधातील पुरावे दाखल केले. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी आता धनंजय मुंडे वाचणार नाहीत असा दावा केला.
दमानिया म्हणाल्या, मी आज कृषी घोटाळ्याशी संबंधित दस्तऐवज एसीबीला दिले. आत्ताच्या घटकेला मी एवढेच सांगेन की, अँटी करप्शन ब्यूरोने या प्रकरणी योग्य ती कारवाई केली, तर याच्यातून धनंजय मुंडे वाचत नाहीत. पण त्यांच्यावर शासकीय किंवा प्रशासनाची मेहेरबानी झाली तर मला माहिती नाही. पण आज जी काही माहिती मी दिली, ती अत्यंत खरी असून, त्यात कोणतीही शंका नाही. मी दिलेले दस्तऐवज 3 कंपन्यांशी संबंधित आहेत. त्यापैकी 2 कंपन्यांमध्ये ऑफिस ऑफ प्रॉफिट होते. त्यांनी पदावर असताना एवढा मोठा कृषी घोटाळा केला. त्यात पहिल्या टप्प्यात 341 कोटींपैकी 161 कोटी खाल्ले गेलेत. हा घोटाळा नाही तर काय आहे? असे त्या म्हणाल्या.





