Agniveer : अग्निवीरांबाबत केंद्र सरकारचा मोठा निर्णय; 2 वर्षे मुदतवाढ अन् ‘या’ सुविधा मिळणार…
Agniveer : अग्निपथ योजनेत बदल नाही. अग्निवीरांचा चार वर्षांचा कार्यकाळ कायम राहणार असून, नियमित सैनिक म्हणून निवड न झालेल्यांना आणखी दोन वर्षे सेवा करण्याची संधी मिळणार आहे.

Agniveer : अग्निपथ योजनेअंतर्गत अग्निवीरांचा चार वर्षांचा सेवा कार्यकाळ कायम राहणार आहे. त्यात कोणताही बदल करण्यात आलेला नाही, असे संरक्षण दलांचे प्रमुख (सीडीएस) जनरल एन. एस. राजा सुब्रमणि यांनी स्पष्ट केले. मात्र, पहिल्या चार वर्षांनंतर नियमित सैनिक म्हणून निवड न झालेल्या अग्निवीरांना आणखी दोन वर्षे सेवा करण्याची संधी मिळणार आहे.
या अतिरिक्त सेवेनंतर नियमित सैनिक होण्याची संधीही त्यांना मिळू शकते. मात्र, त्यासाठी पात्रता आणि ठरवून दिलेल्या निकषांनुसार निवड केली जाईल.
वरिष्ठतेत पहिल्या टप्प्यातील निवडलेल्यांना प्राधान्य –
पहिल्या चार वर्षांनंतर नियमित सैनिक म्हणून निवड झालेल्या २५ टक्के अग्निवीरांना वरिष्ठतेत प्राधान्य मिळेल. अतिरिक्त दोन वर्षांची सेवा पूर्ण केल्यानंतर नियमित सैनिक म्हणून निवड झालेल्यांना त्यांच्यानंतरचे स्थान दिले जाईल. ही संपूर्ण प्रक्रिया गुणवत्ता आणि पात्रतेच्या आधारावर होणार आहे.
सेवा सुरू ठेवण्याचा किंवा सोडण्याचा पर्याय –
अतिरिक्त दोन वर्षांची सेवा पूर्ण झाल्यानंतर अग्निवीरांना लष्करातील सेवा सुरू ठेवायची की स्वेच्छेने बाहेर पडायचे, याचा निर्णय घेता येईल. या काळात त्यांना लष्करातील कामाचा अधिक अनुभव घेता येईल. तसेच कौशल्य आणि कार्यक्षमताही वाढवता येईल.
पहिल्या चार वर्षांत नियमित सैनिक म्हणून निवड झाली नाही, याचा अर्थ संबंधित अग्निवीर कमी पात्र आहे, असा होत नाही. निवड ही ठरवून दिलेल्या निकषांनुसार केली जाते. त्यामुळे अतिरिक्त दोन वर्षांची सेवा ही स्वतःची क्षमता सिद्ध करण्याची आणखी एक संधी असेल, असे सीडीएस यांनी स्पष्ट केले.
वेतनातही टप्प्याटप्प्याने वाढ –
अग्निवीरांना पहिल्या वर्षी दरमहा ३० हजार रुपये वेतन मिळते. विस्तारित सेवेदरम्यान दुसऱ्या वर्षी हे वेतन ४३ हजार ५०० रुपये, तर तिसऱ्या वर्षी ४७ हजार ५०० रुपये होईल. अग्निवीरांच्या योगदानातील ७० टक्के हिस्सा सरकारकडून सुरू ठेवण्याची व्यवस्था आहे. अतिरिक्त दोन वर्षांची सेवा पूर्ण केल्यानंतर अग्निवीरांना मिळणारे एकूण आर्थिक पॅकेज सुमारे १०.९२ लाख रुपये असेल. या व्यवस्थेमुळे अग्निवीरांना लष्करात अधिक काळ काम करण्याची आणि नियमित सैनिक होण्याची संधी उपलब्ध होणार आहे.





