Agnipath Scheme : तरुणांचा भ्रमनिरास! प्रशिक्षणादरम्यानच अनेक उमेदवार मधूनच सोडून गेले ट्रेनिंग…

नवी दिल्ली :- भारतीय लष्कराच्या अग्निपथ योजनेअंतर्गत लवकरच अग्निवीर वेगवेगळ्या युनिट्समध्ये सहभागी केले जाणार आहेत. अग्निपथ योजनेअंतर्गत पहिल्या बॅचची ट्रेनिंग संपली असून दुसऱ्या बॅचची ट्रेनिंग सुरू झाली आहे. पुढील महिन्यात पहिली तुकडी भारतीय लष्करात दाखल होणार आहे. मात्र, प्रशिक्षणादरम्यानच अनेक तरुण मधूनच ट्रेनिंग सोडून गेले आहेत.
लष्कराच्या ट्रेनिंगमध्ये मधूनच बाहेर पडायचे असल्यास काही नियम नाहीत, पण सध्याची परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी सरकार आता नवे नियम बनवण्याच्या तयारीत आहे. एका वृत्तवाहिनीने दिलेल्या माहितीनुसार, मधूनच ट्रेनिंग सोडून जाणाऱ्या तरुणांकडून आता ट्रेनिंग शुल्क आकारण्यात येणार आहेत.
रिपोर्टमध्ये एका अधिकाऱ्याने सांगितल्याप्रमाणे, पहिल्या बॅचमधून 50 पेक्षा अधिक तरुणांनी ट्रेनिंग मधूनच सोडली आहे, तर दुसऱ्या बॅचमध्येही काहीशी अशीच परिस्थिती आहे. त्यामुळे आता मधूनच ट्रेनिंग सोडून जाणाऱ्यांकडून ट्रेनिंग शुल्क आकारण्याचा विचार आहे. यामुळे जे भारतीय लष्करात भरती होण्यासाठी खरोखरच इच्छुक आहेत, अशाच तरुणांवर लक्ष देता येणार आहे.
अधिकाऱ्यांनी हे देखील सांगितले की, मधूनच ट्रेनिंग सोडणाऱ्या तरुणांकडून विविध कारणे देण्यात येतात. काही जणांनी 30 दिवस किंवा त्याहून अधिक मेडिकल लिव्ह घेतली आणि ट्रेनिंगमधून बाहेर पडले. काहींनी अन्य ठिकाणी चांगली संधी मिळाल्याचे सांगून ट्रेनिंग मधेच सोडली. सूत्रांनी सांगितल्याप्रमाणे सैन्यात असा नियम आहे की, जर कोणी 30 दिवसांपेक्षा जास्त दिवस ट्रेनिंगला गैरहजर राहिल्यास त्याला बाहेरचा रस्ता दाखवला जातो.
1 जानेवारीला पहिल्या बॅचमध्ये 19 हजारांहून अधिक अग्निवीरांना सामील करुन घेतले होते. ज्यांची देशभरातील 40 वेगवेगळ्या सेंटर्सवर ट्रेनिंग झाली होती. सहा महिन्यांच्या ट्रेनिंगमध्ये अग्निवीरांसाठी बेसिक आणि ऍडव्हांस्ड मिलिट्री प्रोग्राम्स करुन घेतले जातात. सहा महिन्यांच्या ट्रेनिंगनंतर अग्निवीरांना विविध युनिट्समध्ये तैनात केले जाणार आहे आणि 4 वर्षांनंतर यातील 25 सैनिकांना परमनंट केले जाणार आहे.





