मटका व जुगार बंद न केल्यास आंदोलन

संगमनेर – शहर पोलीस स्टेशन हद्दीत अवैध धंदे सुरू आहे. शहरातील 50 पेक्षा जास्त ठिकाणी मटका, जुगाराच्या पेढ्या सुरू आहेत. या जुगारांमुळे अनेक वेळा दंगली घडलेल्या आहेत. गणेशोत्सवानंतर दसरा, दिवाळी व संगमनेरमध्ये निवडणुकीचे वातावरण आहे. याचा फायदा घेत संगमनेरमध्ये दंगल घडवून संगमनेरचे वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न अवैध व्यावसायिक करत असतात.
अनेक युवा पिढी या अवैध व्यवसायामुळे देशोधडीला लागलेली आहे. छत्रपती शिवाजी महाराज स्मारक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक या ठिकाणी देखील मोठ्या प्रमाणात अवैध मटका व्यवसाय, ऑनलाइन जुगार गेम चालत आहे. त्यामुळे हे धंदे त्वरित बंद करण्यात यावे, अन्यथा आंदोलनाचा इशारा शिवसेनेने दिला आहे.
अनेक वेळा संगमनेर शहरात वाद उद्भवले आहेत. छत्रपती शिवाजी महाराज स्मारक, डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक, प्रार्थनास्थळ, मशीद शेजारी असताना देखील अवैध मटका व्यवसायसह ऑनलाइन जुगार व्यवसाय चालतो. या व्यवसायामुळे अनेक वेळा हिंदू-मुस्लिम वाद देखील झालेले आहेत.
तरीही संगमनेर पोलीस स्टेशन हद्दीतील नागरिकांचा सहनुभूतीपूर्वक विचार करून संगमनेरची शांतता व सुव्यवस्था अबाधित ठेवावी, तसेच संगमनेरमध्ये सुरू असलेला ऑनलाइन गेम, बिंगो, लोटोसह मटका व्यवसाय त्वरित बंद करावा, अन्यथा गणेश विसर्जन मिरवणुकीनंतर शिवसेना पक्षाच्या वतीने कोणत्याही क्षणी उपोषण, रास्ता रोको आंदोलन, मोर्चा व इतर प्रकारचे आंदोलन करण्यात येईल. होणाऱ्या परिणामाची जबाबदारी आपली राहील, असा इशारा शिवसेनेचे माजी शहरप्रमुख अमर कतारी व शिवसैनिकांच्या वतीने देण्यात आला आहे.





