पिंपरी | खड्ड्यात बसून आंदोलन, प्रशासनाची तत्काळ दखल

देहूरोड (वार्ताहर) – बीआरटी मार्गावर पडलेल्या खड्ड्यात बसून आंदोलन केल्यानंतर जागे झालेल्या महानगरपालिका प्रशासनाने तत्काळ रस्त्याच्या दुरूस्तीचे काम सुरू केले आहे. आदर्शनगर, किवळे, मुकाई चौक, के व्हिला समोरील बीआरटी मार्गावर खड्डे पडले असल्याचे वृत्त काही दिवसांपूर्वी प्रभातमध्येही प्रसिद्ध झाले होते. या मार्गावरील खड्डे भरले जात नसल्याने अखेर मनसेने आक्रमक पवित्रा घेत आंदोलन केले.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने मुकाई चौक ते निगडी भक्ती-शक्ती चौकापर्यंत रस्त्याचे काम सुरू होते. मात्र, वर्दळीच्या रस्त्यावरील के विला बिल्डिंग जवळ बीआरटी रस्त्याचे शंभर ते सव्वाशे फुटाचे काम अर्धवट ठेवले होते. या मार्गाच्या दुरूस्तीसाठी मनसेचे पिंपरी-चिंचवड शहर संघटक विनोद भंडारी तर राजेंद्र तरस सोशल फाउंडेशनने वारंवार निवेदन देत आंदोलनाचा इशारा दिला होता. मात्र प्रशासनाने कोणतीही हालचाल केली नाही.
अखेर धर्मपाल तंत्रपाळी यांच्या नेतृत्वात खड्ड्यात बसून आंदोलन करण्यात आले. यावेळी राजेंद्र तरस, सचिन शिंगाडे, विनोद भंडारी, अजय बखारिया, किरण कांबळे, मेघराज तंतरपाळे, गणेश कोंडप्पा, सिंधु तंतरपाळे हे आंदोलनात सहभागी झाले होते. पोलीस निरीक्षक कुदळे यांच्या उपस्थितीत बीआरटीचे अधिकारी एस. एम. काशीद, उपअभियंता कुदळे यांनी आंदोलनाची दखल घेत तातडीने रस्ता दुरूस्तीला सुरूवात केली.





