मुंबईत मराठा क्रांती मोर्चाचा आक्रमक पवित्रा

मुंबई – सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला अंतरिम स्थगिती दिल्याने राज्यात पुन्हा एकदा मराठा क्रांती मोर्चाने आक्रमक पवित्रा घेतला आहे. या पार्श्वभूमीवर मराठा क्रांती मोर्चाने आज (20 सप्टेंबर) मुंबईत सुमारे 18 ठिकाणी ठिय्या आंदोलन केले. ही आंदोलन सकाळी 11 ते दुपारी 1 पर्यंत करण्यात आली.
मराठा समाजातर्फे मुंबईत झालेल्या या आंदोलनात करोनासदंर्भातचे सर्व नियमांचे पालन करण्यात आले आहे. यावेळी आंदोलनकर्ते हे तोंडाला मास्क, सोशल डिस्टन्सिंग आणि सॅनिटायझर या सर्व दक्षतेचे पालन करताना दिसले.
यावेळी मराठा आरक्षणाच्या स्थगितीविरोधात मराठा क्रांती मोर्चाकडून निषेध नोंदविण्यत आला. मुंबईलगतच्या शहरांमध्ये एकाच वेळी ठिय्या आंदोलन करण्यात आले आहे.
मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाल्यानंतर मराठा समाज आक्रमक झाला आहे. आज मुंबईमध्ये सर्वत्र मराठा समाजाची आंदोलने सुररू आहेत.
जोपर्यंत आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत आंदोलने सुररू राहतील. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दडपशाही करत आहेत, असा आरोप या आंदोलकांनी केला.
सरकारमध्ये समन्वयाचा अभाव आहे. ही भूमिका संशयास्पद आहे. मराठा आता रस्त्यावर उतरला आहे. पोलीस भरती ही रद्द झालीच पाहिजे. भाजप म्हणते की त्यांनी सुप्रीम कोर्टात टिकेल असे आरक्षण दिले होते. मग ते सुप्रीम कोर्टात का टिकले नाही, ही फकक्त टोलवाटोलवी आहे, अशी टीकाही मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक वीरेंद्र पवार यांनी केली.
सोलापुरात उद्या “बंद’
मुंबईतील आंदोलनानंतर उद्या 21 सप्टेंबरला सोलापुरात बंदची हाक देण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर आज रात्री (20 सप्टेंबर) सोलापुरातील एसटीची वाहतूक बंद ठेवण्यात आली आहे. दुसरीकडे येत्या 23 सप्टेंबरला कोल्हापुरात राज्यव्यापी गोलमेज परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. यात विविध क्षेत्रातली सर्व तज्ज्ञ मंडळी एकत्र येतील. या परिषदेत पुढील आंदोलनाची दिशा ठरणार असून राज्यभरातून मराठा संघटनांचे नेते, याचिकाकर्ते, पदाधिकारी परिषदेत सहभागी होणार आहेत.





