मराठा आंदोलक आक्रमक ! उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या ताफ्याला दाखवले काळे झेंडे.. VIDEO

पुणे ग्रामीण : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील हे लाखो मराठा बांधवांसह मुंबईच्या दिशेने निघाले आहेत. नगर,पुणे लोणावळा अशा ठीक ठिकाणी जरांगे यांचं मराठा बांधवांकडून जल्लोषात स्वागत करण्यात येत आहे.आरक्षणासाठी मराठा आंदोलक चांगलेच आक्रमक होताना ठिकठिकाणी पाहायला मिळते. अशात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या ताफ्याला मराठा आंदोलकांकडून काळे झेंडे दाखवण्यात आल्याचे समजते.
अजित पवार हे पुण्यातील जुन्नर विधानसभेचा दौरा करतायेत. यावेळी अहमदनगर-कल्याण महामार्गावरील आळे फाटा परिसरात अजित पवारांच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवण्यात आले आहेत.अजित पवारांनी मराठा समाजाला उद्देशून केलेल्या वक्तव्याचा निषेधार्ह हे झेंडे दाखवण्यात आल्याचे समजते.
रस्त्यावर उतरलेल्या मराठा बांधवानी अजित पवार यांच्या गाड्यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न देखील केला.आंदोलनकर्त्यांनी आक्रमक होत एक मराठा लाख मराठा यासह अजित पवार मुर्दाबाद अशी जोरदार घोषणाबाजी केली.
काल मनोज जरांगे यांना पाठिंबा दर्शवण्यासाठी करण्यात आलेल्या आंदोलनावेळी अजित पवारांनी हा दौरा रद्द करावा, अशी मागणी करण्यात आली होती. मात्र मराठा समाजाच्या या मागणीला झुगारून अजित पवार दौऱ्यावर आले, त्यामुळं मराठा समाज आक्रमक झाला. त्यांनी ताफ्याला काळे झेंडे दाखवत, आरक्षण मिळावं यासाठी घोषणाबाजी केली. पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतलं आहे.





