व्हेनेझुएला नंतर अमेरिका ‘या’ देशावर करणार हल्ला; ट्रम्प यांनी दिली धमकी

वॉशिंग्टन: वेनेझुएलामध्ये केलेल्या मोठ्या लष्करी कारवाईनंतर आता अमेरिकेने आपला मोर्चा शेजारील मेक्सिको देशाकडे वळवला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मेक्सिकोमधील ‘ड्रग कार्टेल्स’ म्हणजेच अंमली पदार्थ तस्कर टोळ्यांविरुद्ध थेट जमिनीवर लष्करी हल्ला करण्याची धमकी दिली आहे. ट्रम्प यांच्या या भूमिकेमुळे उत्तर अमेरिका खंडातील दोन मोठ्या देशांमधील राजनैतिक तणाव शिगेला पोहोचला असून जागतिक स्तरावर याकडे मोठ्या चिंतेने पाहिले जात आहे.
यापूर्वी ३ जानेवारी रोजी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या आदेशानुसार अमेरिकन सैन्याने वेनेझुएलामध्ये आक्रमक सैन्य मोहीम राबवली होती. या मोहिमेदरम्यान राजधानी काराकससह मिरांडा, अरगुआ आणि ला गुइरा यांसारख्या महत्त्वाच्या शहरांमधील लष्करी तळांवर भीषण हवाई हल्ले करण्यात आले. या अमेरिकन एअरस्ट्राईकमध्ये सैनिक आणि नागरिकांसह ४० जणांचा मृत्यू झाला. या कारवाईचे सर्वात धक्कादायक पाऊल म्हणजे अमेरिकेच्या ‘डेल्टा फोर्स’ या विशेष तुकडीने वेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो आणि त्यांच्या पत्नी सिलिया फ्लोरेस यांना त्यांच्याच देशातून ताब्यात घेतले. त्यांना सध्या न्यूयॉर्कमध्ये नेण्यात आले असून, अंमली पदार्थांची तस्करी आणि नार्को-दहशतवादाच्या आरोपाखाली त्यांच्यावर खटला चालवला जात आहे.
🚨 Trump says the US will be conducting land strikes against the cartels. “We are gonna start now hitting land, with regard to the cartels. The cartels are running Mexico.” pic.twitter.com/63sOf5NWIy
— Breaking911 (@Breaking911) January 9, 2026
वेनेझुएलातील या यशस्वी मोहिमेनंतर आता ट्रम्प यांनी मेक्सिकोला लक्ष्य केले आहे. एका ताज्या मुलाखतीत बोलताना ट्रम्प यांनी स्पष्ट केले की, मेक्सिकोमध्ये सध्या अंमली पदार्थ तस्कर टोळ्यांचे वर्चस्व असून त्यांना रोखण्यासाठी आता अमेरिकन सैन्याला जमिनीवर उतरून कारवाई करणे अनिवार्य झाले आहे. अमेरिकेत होणाऱ्या अंमली पदार्थांच्या एकूण तस्करीमध्ये मेक्सिको आणि वेनेझुएला या देशांचा मोठा वाटा आहे. नार्को-दहशतवादाविरुद्ध पुकारलेल्या या लढ्यात अमेरिकेने आधीच समुद्रातील तस्करीचे अनेक जहाज निकामी केले आहेत आणि आता मेक्सिकोमधील तस्करांच्या अड्ड्यांवर थेट लष्करी प्रहार करण्याची तयारी सुरू केली आहे.
अमेरिका आणि मेक्सिको हे एकमेकांचे शेजारी आणि व्यापारी भागीदार असले तरी, ट्रम्प यांच्या या नव्या धमकीमुळे दोन्ही देशांतील संबंध कमालीचे ताणले गेले आहेत. मेक्सिकन सरकारच्या वतीने अद्याप यावर कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. मात्र, अमेरिकेने जर मेक्सिकोच्या सीमेत घुसून लष्करी कारवाई केली, तर याचे पडसाद संपूर्ण जगावर उमटण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.





