कराड – कराड तालुक्यातील विविध गावे व वाड्या वस्त्यांमध्ये करोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. त्यामुळे नागरिकांमधील भीती कायम आहे. उंडाळे विभागातील अनेक गावे या महामारीला बळी पडली आहेत. तुळसण येथे 26 करोनाबाधित रूग्ण आढळून आले. यातील बरेचजण करोनामुक्त झाल्याने ग्रामस्थांनी नि:श्वास सोडला होता.
मात्र, आता शेजारील विठ्ठलवाडीतही करोनाबाधित रूग्ण सापडल्याने ग्रामस्थांमध्ये पुन्हा एकदा भीतीचे वातावरण पसरले आहे.
उंडाळे विभागातील म्हारूगडेवाडी येथे पहिला करोनाबाधित रूग्ण आढळून आला होता. त्यानंतर म्हासोली, तुळसण, येळगाव, ओंड आदी गावात करोनाबाधित रूग्ण आढळून आले. मात्र, म्हासोली व तुळसण येथील करोना बाधितांची संख्या अधिक होती. म्हासोली गाव करोनामुक्त झाल्यानंतर तुळसण येथे मुंबईहून आलेल्या एका व्यक्तीच्या माध्यमातून करोनाची साखळी तयार झाली. गावात एकूण 26 बाधित रूग्ण आढळून आले.
कराड पंचायत समितीचा आरोग्य विभाग व उंडाळे पोलिसांनी केलेल्या प्रयत्नामुळे गावाची करोनामुक्तीकडे वाटचाल सुरू आहे. दरम्यानच्या कालावधीत गावातील प्रत्येक रस्ता सील करण्यात आला होता. गावात वारंवार स्वच्छता ठेवून ग्रामस्थांना सूचना करण्यात येत होत्या. बाधितांपैकी आता फक्त एकच रूग्ण करोनामुक्त होणे बाकी आहे. सोमवार, दि. 20 रोजी गाव करोनामुक्त होणार आहे. त्यामुळे ग्रामस्थांनी नि:श्वास सोडला होता.
परंतु, तुळसणपासून एक किमी अंतरावर असणाऱ्या विठ्ठलवाडीत रविवारी रात्री एक करोनाबाधित रूग्ण आढळून आल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी जाहीर केले. त्यामुळे पुन्हा एकदा दोन्ही गावामध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
आता या व्यक्तीच्या संपर्कात नक्की किती लोक आले आहेत. संबंधित व्यक्ती कोणाच्या संपर्कातून बाधित झाली याचा शोध घेण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. संबंधित व्यक्तीच्या माध्यमातून गावात साखळी निर्माण होऊ नये यासाठी प्रशासनास प्रयत्न करावे लागणार आहेत. त्याचबरोबरच ग्रामस्थांनीही सहकार्य करणे गरजेचे आहे.