Investment Scam: मुंबईतील टोरेस कंपनीने जवळपास सव्वा लाख नागरिकांना कोट्यावधी रुपयांना फसवल्याचे समोर आले होते. जास्त परताव्याचे आमिष दाखवून टोरेस कंपनीने कोट्यावाधी रुपयांचा घोटाळा केला. आता टोरेस पाठोपाठ आणखी एका कंपनीने नागरिकांना गंडा घातल्याचे समोर आले आहे.
मुंबईतील ॲक्वा मरीन ग्लोबल कल्चर कंपनीने मोठ्या परताव्याचे अमिष दाखवू नागरिकांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी मोहम्मद इस्माईल शेख यांनी पोलिसात तक्रार दाखल केली आहे. मोहम्मद इस्माईल शेख यांनी या कंपनीत गुंतवणूक केली होती. मात्र, फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी अखेर पोलिसात तक्रार केली.
मोहम्मद इस्माईल शेख यांनी ॲक्वा मरीन ग्लोबल कल्चर कंपनीत 14 लाख रुपयांची गुंतवणूक केली होती. या गुंतवणुकीवर 15 टक्के परतावा देण्याचे आश्वासन कंपनीकडून देण्यात आले होते. मात्र, मोहम्मद यांना मागील काही महिन्यांपासून कोणताही परतावा मिळाला नाही. अखेर त्यांनी पोलिसात कंपनीविरोधात फसवणुकीची तक्रार दाखल करण्याचा निर्णय घेतला. या प्रकरणात आता पोलिसांनी कंपनीचे मालक विनय कांबळे यांना अटक केली आहे.
दरम्यान, टोरेस कंपनी घोटाळ्यात नवनवीन माहिती समोर येत आहेत. या घोटाळ्यात जवळपास सव्वा लाख नागरिकांची फसवणूक झाली आहे. या प्रकरणात पोलिसांनी कारवाई करत आतापर्यंत 3 जणांना अटक केली आहे. या प्रकरणात युक्रेनच्या नागरिकांचा समावेश असल्याचेही समोर आले आहे. तसेच, पोलिसांनी या प्रकरणात 25 कोटींहून अधिक रकमेचा मुद्देमाल व काही गाड्या जप्त केल्या आहेत.