पिंपरी | राजकीय फुटीनंतर मावळ लोकसभेचा कौल शिंदे गटाच्या बाजूने

पिंपरी, (प्रतिनिधी) – मावळ लोकसभा मतदार संघाच्या निर्मितीपासून प्रतिकूल परिस्थितीतही हा मतदार संग शिवसेनेच्या बाजून उभा राहिला. त्यामुळे आतापर्यंत गजानन बाबर व श्रीरंग बारणे यांनी या मतदार संघाचे शिवसेनेकडून प्रतिनिधित्व केले. मात्र, शिवसेनेतील राजकीय फुटीनंतर दोन्ही शिवसेनेने या मतदार संघात आपला उमेदवार उभा केला होता. मात्र, शिवसेनेतील राजकीय फुटीनंतर श्रीरंग बारणे यांच्या विजयाने हा मतदार संघ आता एकनाथ शिंदे शिवसेना गटाकडे असल्याचे स्पष्ट झाले आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या दोन्ही दिग्गजांनी लक्ष घातल्याने मावळ लोकसभा मतदार संघातील लढतीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले होते. त्यामुळे अगदी प्रचारापासून या मतदार संघातील लढत चर्चेचा विषय ठरली होती. तर शिवसेनेतील राजकीुय दुफळीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासाठीदेखील ही लढत प्रतिष्ठेची होती. त्यामुळे या लढतीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले होते.
राजकीय फुटीनंतर उद्धव ठाकरे यांना सहानुभुतीच्या लाटेचा फायदा मिळेल, अशी चर्चा होती. तर उद्धव ठाकरे यांना मानणारा मोठा वर्ग या मतदार संगात असल्याने संजोग वाघेरे यांना याचा फायदा होईल, अशी मोठी चर्चा रंगली होती. तर संजोग वाघेरे यांनीदेखील आक्रमक भूमिका न घेता, प्रचारावर भर दिला होता.
विजयाचे समीकरण बिघडल्याने वाघेरे पराभूत
शिवसेनेतील राजकीय फुटीनंतर उद्धव ठाकरे यांच्याविषयी जनमानसात तयार झालेली सहानुभुतीची लाट, घाटाखालचे शिवसेनेचे हक्काचे मतदान आणि राष्ट्रवादीचा छुपा पाठिंबा अशा राजकीय समीकरणावर संजोग वाघेरे यांचे विजयाचे समीकरण होते. मात्र, ही राजकीय समीकरणे बिघडल्याने वाघेरे पराभूत झाल्याचे दिसून आले.





