Kolhapur Politics : कोल्हापुरातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांनंतर जिल्ह्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची चिन्हे दिसत आहेत. शरद पवार गटाला मोठा धक्का देत कागल नगरपरिषदेतील प्रभावी नेते आणि शाहू ग्रुपचे प्रमुख समरजितसिंह घाटगे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. महापालिकांनंतर जिल्हा परिषद निवडणुकांवर लक्ष केंद्रित केलेल्या भाजपने स्थानिक पातळीवरील दमदार नेत्यांना पक्षात खेचण्यासाठी डावपेच आखले असल्याचे दिसत आहे. समरजितसिंह घाटगे यांच्या भाजप प्रवेशाची केवळ औपचारिकता बाकी असल्याचे वक्तव्य मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केल्याने या चर्चांना अधिक बळ मिळाले आहे. कोल्हापूर जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर झालेल्या महायुतीच्या बैठकीला चंद्रकांत पाटील यांच्यासह समरजितसिंह घाटगेही उपस्थित होते. या बैठकीनंतर घाटगे गटाचे उमेदवार जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपच्या कमळ चिन्हावर निवडणूक लढवणार असल्याचेही संकेत देण्यात आले आहेत. लोकसभा निवडणुकीच्या वेळी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केलेले समरजितसिंह घाटगे यांनी नंतर विधानसभेला हसन मुश्रीफ यांच्याविरोधात निवडणूक लढवली होती. कागल नगरपरिषदेच्या निवडणुकीत त्यांनी राजकीय मतभेद विसरून हसन मुश्रीफ यांच्यासोबत युती केली होती. मात्र निवडणुका झाल्यानंतर अल्पावधीतच ते पक्षांतर करणार असल्याने कोल्हापुराच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.