जांबुत – शिरूरच्या बेट भागात बिबट्याने धुमाकूळ घातल्यानंतर भीतीच्या सावटाखाली असलेल्या नागरिकांच्या जीवाला चोरीच्या घटनांनी पुन्हा एकदा घोर लावला आहे. पिंपरखेड (ता. शिरूर) येथे चार ते पाच जणांच्या टोळक्याने गावठाण आणि बोंबेमळा वस्तीवर धुमाकूळ घालून चोरीचे प्रयत्न केले. मात्र नागरिकांच्या प्रसंगावधान व सतर्कतमुळे या चोरीच्या घटना टळली. या घटनेची माहिती मिळताच शिरूरचे पोलीस उपनिरीक्षक दिलीप पवार, सहायक फौजदार चव्हाण यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की, गुरुवारी (दि.२५) रोजी पहाटे अडीच ते साडेतीन वाजेच्या सुमारास पिंपरखेड गावठाणातील रूपचंद भगवानदास गांधी यांचे दुकानाचे शटर तोडून दुकानाच्या गल्ल्यात असलेली चिल्लर रक्कम चोरून नेली. तर त्याच शेजारील असलेल्या प्रवीण गांधी यांच्या बंद दुकानाचे शटर उघडण्यात आले, त्यानंतर शेतकरी बबन तसेच सुभाष नवगिरे यांचे घराचे कडी कोयंडे तोडण्याचा चोरट्याने प्रयत्न केला. यावेळी जाग आलेल्या गाव शेती कुटुंबियांनी आवाज दिल्यानंतर चोरट्यांनी तिथून पलायन केले. चोरट्यांचे उसाच्या शेतामधून पलायन नंतर त्यांनी एक किलोमीटर अंतरावर असलेल्या बोंबेमळा येथील मारुती भाऊसाहेब बोंबे यांच्या बंगल्याचा दरवाजाचे लॉक तोडून घरात प्रवेश केला. यावेळी तीन ते चार जण आपल्या हातात लोखंडी रॉड व सत्तूर सदृश्य हत्यार असल्याचे बोंबे कुटुंबियांनी सांगितले. मात्र तेथूनही चोरांनी देवगाव (ता. आंबेगाव) रस्त्याच्या बाजूने उसाच्या शेतामधून पलायन केले. दरम्यान, या चोरीच्या घटनांमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या चोरट्यांचा पोलीस प्रशासनाने बंदोबस्त करून त्यांना जेरबंद करण्याची मागणी परिसरातील ग्रामस्थांनी केली आहे. ‘अशा प्रकारच्या घटना होत असताना नागरिकांनी रात्रीच्या वेळी सावधानता बाळगणे गरजेचे असून सोन्याच्या मौल्यवान वस्तू, पैसे, दागिने हे घरात न ठेवता इतरत्र सुरक्षित ठिकाणी ठेवावेत. त्याचबरोबर अनोळखी किंवा संशयास्पद इसम आपल्या परिसरात आढळल्यास त्याबाबतची गोपनीय माहिती गावातील पोलीस पाटील, तंटामुक्ती अध्यक्ष किंवा पोलीस प्रशासनाला द्यावी. तसेच या भागात झालेल्या चोरीच्या घटनेचा माग काढून लवकरच छडा लावण्यात येईल.’ – दिलीप पवार, पोलीस उपनिरीक्षक, शिरूर ‘गेली पन्नास वर्षात या वस्तीवर अशा प्रकारे झालेली घटना आठवत नसून रात्री घडलेल्या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे मात्र या घटनांचे गांभीर्य लक्षात घेता पोलीस प्रशासनाने रात्रीच्या वेळी जास्त वाढविणे गरजेचे असून यासाठी ग्रामसुरक्षा दलातील जवानांची मदत घ्यावी तसेच एकाच मार्गाने गस्त न घालता वाड्या वस्तूंवर देखील पोलीस प्रशासनाने गस्त घालावी.’ – पांडुरंग बोंबे, माजी सैनिक