नागपूर शहरात तणावपूर्ण शांतता; चंद्रशेखर बावनकुळे आज घटनास्थळी भेट देणार

Nagpur News | औरंगजेबाच्या कबरीच्या मुद्द्यावरून नागपूरमध्ये रविवारी १७ मार्च २०२५ रोजी संध्याकाळी दोन गट आमनेसामने आल्यानंतर शहरात तणाव निर्माण झाला. नागपूरच्या महाल परिसरात संतप्त जमावाने दगडफेक करत पोलिसांवर हल्ला करत अनेक वाहने पेटवून दिली. या घटनेत एक वरीष्ठ पोलीस अधिकाराही जखमी झाला आहे. नागपूर घटनेची सरकारकडून गंभीर दखल घेण्यात आली आहे.
नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे प्रशासनातील वरिष्ठांशी संवाद साधणार आहेत. बावनकुळे हे सकाळी १० वाजता घटनास्थळी भेट देणार आहेत. नागपूर येथील महाल भागाची बावनकुळे पाहणी करणार आहेत. मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनुसार बावनकुळे तातडीने नागपूरला रवाना झाले आहेत.
दरम्यान, नागपूरमध्ये जाळपोळ आणि दगडफेकीची घटना घडताच चंद्रशेखर बावनकुळे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या महत्त्वाची बैठक पार पडली आहे. त्यानंतर चंद्रशेखर बावनकुळे आणि नागपूर जिल्ह्यातील अन्य आमदारही 18 मार्च रोजी घटनास्थळाची पाहणी करणार आहेत. या घटनेत झालेल्या वित्तीय नुकसानीसह शासकीय कर्मचाऱ्यांना झालेल्या मारहाणीचा आढावा देखील घेतला जाईल.
पोलीस अधिकाऱ्यावर कुऱ्हाडीने हल्ला
दुसरीकडे पोलिसांनी सध्या समाजकंटकांना पांगवण्यात यश मिळवले आहे. नागपूर शहरातील स्थिती सध्या नियंत्रणात आहे. पोलिसांनी आतापर्यंत 15 दंगेखोरांना ताब्यात घेतलं आहे. या दंगलीदरम्यान पोलीस अधिकारी निकेतन कदम यांच्यावर एका अज्ञात व्यक्तीने थेट कुऱ्हाडीने हल्ला केला आहे. या हल्ल्यात त्यांच्या हाताला गंभीर दुखापत झाली आहे.सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
सध्या नागपूरमध्ये परिस्थिती नियंत्रणात असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. मात्र, पोलिस बंदोबस्त वाढवण्यात आला असून, संवेदनशील भागांमध्ये गस्त घालण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
हेही वाचा:
स्वारगेट प्रकरणातील पीडितीने घेतली उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट; म्हणाली आरोपीला…





