संगमनेर -संगमनेर बाह्यवळण रस्त्यावर गुंजाळवाडी चौफुली येथील अंडर बायपासजवळ पाइपलाईन दुरुस्तीच्या कामासाठी सर्व्हिस रोड खोदण्यात आला होता. मात्र त्याची व्यवस्थित दुरुस्ती न केल्याने त्यावरून वाहन चालवणे तर दूरच. पण पादचाऱ्यांना साधे चालणेही कठीण झाले आहे. त्यामुळे महामार्ग प्रशासनाने याकडे गांभीर्याने पाहावे आणि हा रस्ता व्यवस्थित दुरुस्त करावा, अशी मागणी नागरिक करत आहेत.
गुंजाळवाडी शिवारातील चौफुली येथील अंडर बायपासजवळ घुलेवाडी ते राजापूरकडे येताना असलेला सर्व्हिस रोड काही दिवसांपूर्वी पाइपलाईन दुरुस्तीच्या कामासाठी 10 बाय 15 फूट खोदण्यात आला होता. पाइपलाईन दुरुस्तीचे काम झाले. मात्र हा खड्डा व्यवस्थित न बुजवल्याने प्रवाशांचा जीव धोक्यात आला आहे. महत्त्वाचे म्हणजे शेतकऱ्यांनीच हा सर्व्हिस रोड खोदला होता. त्यांनीच काम झाल्यावर तो व्यवस्थित दुरुस्त करणे अपेक्षित होते. मात्र तसे काहीही झाले नसल्याचे दिसत आहे. विशेष म्हणजे रस्ता असाच सोडून दिल्यावर पुणे-नाशिक महामार्ग प्रशासनाच्या वतीनेही त्यावर काहीच आक्षेप का घेण्यात आला नाही, असा प्रश्नही उपस्थित होत आहे.
या रस्त्याने दररोज शेकडो प्रवासी ये-जा करत असतात. मात्र या रस्त्याच्या दुरवस्थेमुळे वाहन चालविणेही अशक्य झाले आहे. त्यामुळे हा सर्व्हिस रोड तयार करण्यासाठी केलेला खर्च, पाइपलाईन टाकणाऱ्यामुळे खड्ड्यात गेला आहे. महामार्ग प्रशासनाने या सर्व्हिस रोडची डागडुजी करून वाहनचालकांना दिलासा द्यावा, अशी मागणी गुंजाळवाडी येथील तंटामुक्ती अध्यक्ष रोहिदास गुंजाळ यांनी केली आहे.