Lok Sabha Election 2024 । लोकसभा निवडणुकीचे अंतिम निकाल समोर आले आहेत. एनडीएला 292 तर भारत आघाडीला 234 जागा मिळाल्या आहे. त्याचवेळी 17 जागा इतरांच्या खात्यात गेल्या आहे. तर भाजप आणि काँग्रेसबद्दल बोलायचे झाले तर सत्ताधारी पक्ष भारतीय जनता पक्षाला २४० तर काँग्रेसला ९९ जागा मिळाल्या आहेत. यंदाच्या निडवणुकीत भाजपने बहुमताचा आकडा पार केला नाही. त्यामुळे आता यावरून विरोधी पक्षाकडून भाजपवर टीका केली जात आहे. अशात महाविकास आघाडीने राज्यात ४८ जागांपैकी ३१ जागा जिंकल्या आहे. आणि राज्यातील सत्तेत असलेल्या महायुतीला १८ जागा मिळाल्या आहे. अशात आज सामनाच्या अग्रलेखातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर पुन्हा एकदा टीका करण्यात आली आहे. अग्रलेखात नरेंद्र मोदी या व्यक्तीचा दारुण पराभव भारतीय जनतेने केला आहे अस म्हणत टीका करण्यात आली आहे. नेमकं काय आहे सामनाचा अग्रलेख स्वतःला ईश्वराचा अवतार समजणाऱ्या नरेंद्र मोदी या व्यक्तीचा दारुण पराभव भारतीय जनतेने केला आहे. हा लोकशाहीने हुकूमशाही, झुंडशाहीवर विजय मिळवला आहे असंच म्हणावं लागेल. नरेंद्र मोदींचा चारशेपारचा नारा सुकलेल्या पाचोळ्यासारखा उडून गेला. लोक सार्वभौम आहेत. लोकशाहीचे संरक्षणकर्ते लोकच असतात हे भारताने दाखवून दिलं आहे. चारशे जागा निवडून द्या, नव्हे चारशे जागा निवडून आणणारच या अहंकाराला भारतीय जनतेने पायदळी तुडवलं. खुद्द वाराणसीत मोदी सुरुवातीच्या टप्प्यात पिछाडीवर पडले तेव्हा देव जागा आहे हे दिसून आले. नरेंद्र मोदी आणि अमित शाह या जोडगोळीने भारत देशाचा तुरुंग केला. जनतेलाही मोकळेपणाने बोलण्याचं किंवा वावरण्याचं स्वातंत्र्य नव्हतं. विरोधात बोलणाऱ्यांना सरळ तुरुंगात टाकलं गेलं.” अशी टीका सामनात करण्यात आली आहे. भाजपाने पक्षाचं वॉशिंग मशीन केलं दिल्ली, झारखंडच्या बहुमतातील मुख्यमंत्र्यांना सरळ तुरुंगात टाकणाऱ्या मोदी शाह यांनी भारतीय जनता पक्षाचं वॉशिंग मशीन केलं. देशातल्या सर्व पक्षांतील भ्रष्ट नेत्यांना भाजपात आणून आयेगा तो मोदीही हा नारा देणाऱ्यांना जनतेने जागा दाखवली. लोकसभा निवडणुकीचे निकाल हाच जनादेश आहे. या जनादेशाचा आदर मोदी करणार आहेत काय? भाजपाला बहुमत मिळालेले नाही हे पहिले सत्य व कथित एनडीएच्या बहुमताचा आकडा काठावर आहे. चारशे पारच्या रथावर स्वार होऊ पाहणाऱ्या मोदींना रिक्षात बसून रायसिना हिल्सवर फिरावं लागेल. देशाचं चित्र स्पष्ट झालं आहे. ज्या उत्तर प्रदेशात राम मंदिराचं राजकारण करुन मोदी स्वतःला हिंदूंचे नवे शंकराचार्य म्हणून प्रस्थापित करु पाहात होते त्या उत्तर प्रदेशात समाजवादी पार्टी आणि काँग्रेसने मोठी आघाडी घेतली. अमेठीत स्मृती इराणींचा पराभव राहुल गांधींच्या सामान्य कार्यकर्त्याने केला. रायबरेलीत राहुल गांधी विजयी झाले. मोदींच्या अहंकाराचा गाडा रोखण्याचं काम उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्राने केलं. मोदी-शाह यांनी घाणेरडं राजकारण केलं शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस फोडून मोदी शाह यांनी घाणेरडं राजकारण केलं. शिवसेना राष्ट्रवादी फोडून एकतर्फी विजय मिळवता येईल या भ्रमाचा भोपळा मराठी जनतेने फोडला. सत्तेचा अमर्याद वापर, पैशांचा धो-धो पाऊस मिंधे सेनेने पाडला, अजित पवारांनी अनेकांना मतदारसंघात धमक्या दिल्या, दहशत निर्माण केली. फडणवीसांनी अनाजीपंतांचं राजकारण केलं. या सगळ्या कारस्थानांचा पराभव महाराष्ट्राने केला. मोदी-शाह यांनी महाराष्ट्रात ५० सभा घेतल्या पण हाती काहीही लागलं नाही.