Satara | आचारसंहिता संपल्यावर तीन प्रकल्पांची कामे सुरू

कोयनानगर, (वार्ताहर) – कोयना भागाच्या निसर्गसौंदर्याला चार चाँद लावण्यासाठी महायुती सरकारने जलपर्यटनाला मान्यता दिली आह. हेळवाक, पापर्डे व येरड येथील बोटिंग स्पॉट विरोधकांना खड्डे दिसतात. त्यांना खड्ड्यात घालायचे आहे. कोयनेच्या वैभवात भर टाकणार्या जलपर्यटनाच्या कामाला आचारसंहिता संपल्यावर सुरवात होणार आहे.
रासाटी येथे इको टुरिझमसह आपत्ती निवारण दल व पोलीस प्रशिक्षण केंद्र हे महत्त्वाकांक्षी प्रकल्प उभारले जात असल्याने, कोयनेतील पर्यटन कात टाकणार आहे. वाटोळे येथे उत्पादन शुल्क विभागाचे प्रशिक्षण केंद्र उभारले जाणार असल्याने पाटण तालुक्यात स्थानिकांना रोजगार मिळणार आहेत.तालुक्यात जोपर्यंत मी आहे, तोपर्यंत स्थानिकांचा बोलबाला राहणार आहे, असा विश्वास पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी व्यक्त केला.
पाटण विधानसभा मतदारसंघातील शिवसेना, भाजप व मित्रपक्षांचे अधिकृत उमेदवार शंभूराज देसाई यांचा कोयना भागातील संवाद मेळावा उत्साहात झाला. त्यावेळी ते बोलत होते. शिवसेना जिल्हाप्रमुख जयवंतराव शेलार, शिवदौलत बँकेचे संचालक अशोकराव पाटील,
उपजिल्हाप्रमुख सावळाराम लाड, सदानंद साळुंखे, भागोजी शेळके, सरपंच गजानन कदम, दिलीपराव संकपाळ, युवा सेना तालुकाप्रमुख अजय देसाई, शैलेंद्र शेलार, विकास पाटील, धोंडीराम भोमकर, नथुराम सावंत, किसनराव सावंत, महादेव येडगे, प्रदीप पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
शंभूराज देसाई म्हणाले, गेल्या पाच वर्षांत पोत्याने निधी आणून, तालुक्याचा चेहरामोहरा बदलण्याचे काम केले आहे. आम्ही कधी सुडाचे, गटातटाचे राजकारण केले नाही. आम्ही लढत राहिलो, पण मागे हटलो नाही.
तालुक्यातील जनतेला दिलेला शब्द प्राणपणाने पाळला. तालुक्यात विकासकामांचे जाळे उभारले असून, त्यातूनच विरोधकांना उत्तर देणार आहे. लाडक्या बहिणी ही निवडणूक हातात घेऊन, विरोधकांचा बीमोड करतील. यावेळी जयवंतराव शेलार, अशोकराव पाटील, गजानन कदम यांची भाषणे झाली.
पाटणकर गट, मनसेला खिंडार
कोयनानगरचे माजी सरपंच मनीष चौधरी, अर्जुन कदम, मेंढेघर येथील सुरज कदम यांनी पाटणकर गटातून आणि नाना जाधव, राजन जाधव यांनी मनसेतून शिवसेनेत प्रवेश केला. त्यामुळे राष्ट्रवादी शरद पवार गट व मनसेला खिंडार पडले आहे.





